वीजबिलाची समस्या तात्पुरती : सतीश जारकीहोळी
बेळगाव : केईआरसीने राज्यात केलेली दरवाढ नेमकी कोणत्या कारणाने केली याबाबत पुरेशी माहिती नाही. पूर्ण माहिती घेतल्यानंतर यासंदर्भात भाष्य करेन. परंतु कोणताही उद्योग महाराष्ट्रात जाणार नाही. कारण देशाच्या सर्वच राज्यात विजेची समस्या निर्माण झाली आहे. कर्नाटकात निर्माण झालेली वीज समस्या ही तात्पुरती असल्याचे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बैठकीपूर्वी पत्रकारांशी चर्चा करताना त्यांनी विविध विषयांबद्दल माहिती दिली. शक्ती योजनेमुळे महिलांना राज्यात मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेचे राज्य सरकारने व्यवस्थित नियोजन केले असल्याने परिवहन मंडळाच्या महसुलात वाढ होणार आहे. यामुळे परिवहन व्यवस्था सुधारणे व कर्मचाऱ्यांना वेतनवाढ करणे सोयीचे ठरेल, असे त्यांनी सांगितले. वाढत्या वीजबिलामुळे बेळगावमधील उद्योग शेजारील महाराष्ट्र राज्यात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परंतु बेळगावमधील उद्योग बाहेर जाणार नाहीत, याची खबरदारी राज्य सरकार घेणार आहे. उद्योजकांशी चर्चा केली जात असून त्यांना सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. कोणताही बदल हा एका रात्रीत होत नसल्यामुळे त्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.









