15 वर्षांपासून विचित्रप्रकारे जगतोय इसम
स्वत:च्या जीवनात अधिकाधिक पैसे कमावून सुविधाजनक आयुष्य जगण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. कुणीच गरीबीत जगण्याची इच्छा बाळगत नाही. परंतु एका व्यक्तीने उत्तम शिक्षण मिळवत कुठलीही चांगली नोकरी मिळविण्याची पात्रता असतानाही स्वत:च्या आयुष्याबद्दल वेगळाच निर्णय घेतला आहे.

ब्रिटनमध्ये राहणाऱ्या मार्क बोएल याची ही कहाणी आहे. त्याने 2008 सालीच पैशांचा वापर करणे बंद केले होते आणि तेव्हापासून तो कुठल्याही पैशांशिवाय जगत आहे. मार्क हा उच्चशिक्षित असून तो कुठलीही नोकरी करू शकते. परंतु त्याने तंत्रज्ञान आणि इतर गोष्टी त्यागून नैसर्गिक आयुष्य निवडले आहे.

मार्कने बिझनेस आणि अर्थशास्त्रात पदवी मिळविली आहे. त्याला ब्रिस्टल येथील एका फूड कंपनीत उत्तम पगाराची नोकरी देखील मिळाली होती. स्वत:च्या जीवनात यशस्वी ठरावे म्हणून अनेक वर्षांपासून मेहनतही करत होता. परंतु 2007 मध्ये अचानक एका रात्री त्याचे पूर्ण विचारचक्रच बदलून गेले. हाउसबोटमध्ये बसलेला असताना पैसा हाच सर्व समस्यांचे मूळ असल्याचे त्याला जाणवले. त्याने तेथेच पैसे न कमाविण्याचा आणि न खर्च करण्याचा संकल्प घेतला.
मार्कने या घटनेनंतर स्वत:ची महागडी हाउसबोट विकली आणि एका जुन्या कॅम्पव्हॅनमध्ये राहण्यास सुरुवात केली. त्याने पैशांशिवाय जगण्यास सुरुवात केली. काही महिने त्याला त्रास देखील झाला, परंतु त्याने चहा, कॉफी आणि इतर सुविधा त्यागल्या. निसर्गाकडून प्राप्त गोष्टींचाच तो वापर करतो. तेव्हापासून मी आजारी झालो नाही तसेच कुठल्याही सुरक्षेची मला गरज नाही. आता माझे अनेक मित्र झाले असल्याचे तो सांगतो. 2017 मध्ये त्याने तंत्रज्ञानाचा वापर पूर्णपणे सोडला आहे. स्वत:च्या जुन्या आयुष्याऐवजी मी भविष्याविषयी विचार करतो असे त्याने म्हटले आहे.









