लोकांचा प्रामाणिक आवाज ः मुख्यमंत्री विरुद्ध उपराज्यपाल संघर्ष
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली विधानसभेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ‘उपराज्यपालांचा काय अधिकार’ या टिप्पणीला विनय सक्सेना यांनी प्रत्युत्तर देण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. उपराज्यपाल सक्सेना यांनी मुख्यमंत्री केजरीवालांना पत्र लिहून मी तुमचा हेडमास्तर नसून लोकांचा प्रामाणिक आवाज असल्याचे सांगितले आहे. 4 पानी पत्रात सक्सेना यांनी विधानसभेपासून उपराज्यपालांचे कार्यालय, आमदार, मंत्र्यांची रॅली, शिक्षकांचा फिनलंड दौरा, दिल्लीतील खासगी शाळा, शालेय गुणवत्तेचा उल्लेख केला आहे.
मुख्यमंत्री केजरीवाल आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटीसाठी वेळ दिला होता, परंतु त्यांनी सर्व आमदारांसोबत त्यांची भेट घ्यावी अशी मागणी केली होती, कमी वेळेत हे शक्य नव्हते असा दावा उपराज्यपालांनी केला आहे.
2013-14 मध्ये दिल्लीतील शासकीय शाळांमध्ये 16.1 लाख मुले शिकत होती, 2019-20 मध्ये हा आकडा 15 लाखापर्यंत कमी झाला आहे. तर दुसरीकडे शहराची लोकसंख्या वाढल्याने शालेय प्रवेशाचे प्रमाणही वाढायला हवे होते. राष्ट्रीय कामगिरी सर्वेक्षणानुसार दिल्लीतील शासकीय शाळांमधील 8 वीपर्यंतच्या 30 टक्के विद्यार्थ्यांची कामगिरी किमान पातळीपेक्षाही कमी आहे. मुलांमध्ये गणित आणि विज्ञानाचा फोबिया आहे. यामुळे इयत्ता 12 वीत 2 लाख 31 हजार 448 विद्यार्थ्यांपैकी केवळ 21,340 जणांनी विज्ञान शाखा निवडल्याचे उपराज्यपालांनी पत्रात नमूद पेले आहे.
दिल्लीत खासगी शाळेत प्रवेश घेणाऱया मुलांची संख्या वाढली आहे. 213-14 मध्ये हे प्रमाण 35 टक्के होते, 2019-20 मध्ये हे प्रमाण 43 टक्के झाले आहे. कोरोना काळात मोठय़ा संख्येत विद्यार्थी खासगीतून शासकीय शाळांमध्ये दाखल झाले, तरीही खासगी शाळांमध्ये 43 टक्के विद्यार्थी शिकत आहेत.
मी केजरीवालांचा हेडमास्तर नाही, मागील 7-8 वर्षांपासून दिल्लीत राहत असून मला राजधानीची चिंता आहे. मी लोकांचा प्रामाणिक आवाज आहे. दिल्ली गंभीर समस्यांनी वेढलेली असताना केजरीवाल आणि त्यांचे सहकारी निदर्शने करत आहेत असा दावा सक्सेना यांनी पत्रात केला आहे.
कायदा-सुव्यवस्थेवर लक्ष द्या
तर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालिवाल यांच्यासोबत घडलेल्या गैरवर्तनाच्या घटनेवरून उपराज्यपालांवर निशाणा साधला आहे. दिल्लीत गुंडांना धाक राहिलेला नाही. उपराज्यपालांनी काही दिवस राजकारण सोडून देत कायदा-सुव्यवस्थेवर लक्ष द्यावे हीच विनंती असल्याचे केजरीवालांनी म्हटले आहे.









