मालवण । प्रतिनिधी
युवा पिढी आणि नागरिकांमध्ये अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी मालवण पोलिसांनी ‘नो ड्रग्स डे’ मोहिमे अंतर्गत १३ ते १७ ऑगस्ट या कालावधीत विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा प्रारंभ आज तिरंगा रॅलीने करण्यात आला. ज्यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शासकीय कर्मचारी सहभागी झाले होते. ही रॅली मालवण नगर परिषदेपासून सुरू होऊन बाजारपेठेतून पुन्हा नगर परिषदेपर्यंत पोहोचली. या रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांनी हातात तिरंगा घेऊन “अंमली पदार्थांना नाही म्हणा” आणि “निरोगी जीवन जगा” अशा घोषणा दिल्या. या उपक्रमाचा मुख्य उद्देश समाजामध्ये अंमली पदार्थांच्या व्यसनाचे दुष्परिणाम आणि त्यामुळे होणारी हानी याविषयी जनजागृती करणे हा होता.यावेळी मालवण पोलीस ठाण्याच्या वतीने उपस्थित नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. पोलिसांनी अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी असलेल्या कठोर कायद्यांची माहिती दिली आणि समाजाला या गंभीर समस्येविरुद्ध एकत्र येण्याचे आवाहन केले. या रॅलीमुळे मालवण शहरात अंमली पदार्थांच्या विरोधात एक सकारात्मक संदेश पोहोचला आहे.या मोहिमेमुळे अंमली पदार्थांच्या विळख्यातून समाजाला वाचवण्यासाठी पोलिसांचा सक्रिय सहभाग आणि नागरिकांचा प्रतिसाद दिसून आला आहे. पुढील काही दिवसांत या मोहिमेअंतर्गत इतरही अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.









