महसूलमंत्री कृष्ण भैरेगौडा यांची पत्रकार परिषदेत माहिती : दर महिन्याला कामाचा आढावा घेणार
प्रतिनिधी/ बेळगाव
राज्याच्या काही भागामध्ये मान्सून जोरात कोसळत आहे तर काही भागामध्ये प्रमाण कमी आहे. जलाशयामधील पाणीसाठा कमी झाला असला तरी अद्याप पाण्याची गंभीर समस्या उद्भवली नाही. ज्या ठिकाणी समस्या उद्भवली आहे त्याठिकाणी 24 तासांत टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येत्या काही दिवसांत मान्सून अधिक सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण होणार नाही, असे महसूलमंत्री कृष्ण भैरेगौडा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सुवर्णसौध येथे जिल्ह्यातील समस्यांचा आढावा घेण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी अधिक सक्रिय होऊन काम करावे. 90 दिवसांत प्रलंबित असलेली महसूल विभागातील प्रकरणे निकालात काढावीत, अशी सूचना केली आहे. जमिनीसंदर्भातील कोणतेही वाद 90 दिवसांतच निकालात काढण्याबाबत आदेश देण्यात आले असून दर महिन्याला आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
कामचुकार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार
सर्वसामान्य जनतेला जिल्हाधिकारी, तहसीलदार किंवा इतर महसूल कार्यालयांमध्ये हेलपाटे मारायला लावू नका, अशी सक्त ताकीद अधिकाऱ्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले. कामचुकार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. प्रशासन सुधारणा करण्याकडे आमचे प्राधान्य असेल. जनतेची कामे सुलभरित्या व्हावीत, तंत्रज्ञानाचा वापर योग्यप्रकारे करावा, याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
केंद्राच्या मार्गसूचीनुसार आवश्यक उपाययोजना
केंद्र सरकारच्या मार्गसूचीनुसार राज्यामध्ये आवश्यक उपाययोजना केल्या जातील. विविध ठिकाणी 311 गावांना आतापर्यंत टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. 387 खासगी कूपनलिकांचे पाणीदेखील यासाठी वापरण्यात येत आहे. सध्या दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही. 10 जुलैनंतर याबाबत आढावा घेतला जाईल आणि पुढील निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
समस्या सोडविण्याचे आश्वासन
सध्या मान्सूनचे आगमन झाल्यामुळे खरीप हंगामाच्या पेरणीला जोर आला आहे. यासाठी शेतकऱ्यांना बी-बियाणे आणि खते उपलब्ध करून देण्यात आली आहेत. शेतकऱ्यांना निर्माण होणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. जलाशयामध्ये असलेल्या पाणीसाठ्याबाबतची माहिती प्रादेशिक आयुक्तांनी सरकारकडे पाठवावी, असेही निर्देश दिले आहेत. काही जलाशयांनी तळ गाठला आहे. त्यामुळे काही ठिकाणी समस्या निर्माण झाली असून ती सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे स्पष्ट केले.









