कोल्हापूर :
विधानसभा निवडणूकीमध्ये 80 लाख मते घेणाऱ्या काँग्रेसचे केवळ 15 उमेदवार विजयी झाले. शिवसेना शिंदे गटाला 79 लाख मते मिळून 57 जागांवर तर अजित पवार गटाला 58 लाख मतदान मिळून 41 जागा मिळाल्या आहेत. खात्रिशिर कागदपत्रे हातामध्ये नसल्याने ईव्हीएमवर शंका उपस्थित करणे योग्य ठरणार नाही. पण मतांची मिळालेली आकडेवारी आश्चर्यकारक असल्याची शंका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपस्थित केली. महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विरोधी पक्ष नेता राहू नये याची ही खबरदारी सत्ताधाऱ्यांनी घेतली असल्याची टिका पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.
मारकरवाडीला आज जाणार
मारकरवाडी येथे जुन्या पद्धतीने मतदान करण्याची मागणी केली आहे. मग सरकार त्यांना बंदी का करत आहे. असा कोणता कायदा आहे. त्या ठिकाणी 144 कलम लावण्यात आले आहे. हे कलम लावण्याचे कारण काय, हे पाहण्यासाठी मरकरवाडी येथे जाणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. तेथील नागरीक आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधणार असून आणखी काही लोक सोबत येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
वातावरण अनुकूल निकाल नाही
राज्यामध्ये महाविकास वातावरण अनुकुल होत. पण निकाल अनुकुल नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले. राज्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या सभेला होणारी गर्दी पाहून विजय निश्चित असल्याचे वाटत होते. मात्र प्रत्यक्षात निकाल वेगळा लागला आहे. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असते, त्यामुळे निकालावर आणि ईव्हीएमबाबत आत्ताच बोलणे योग्य ठरणार नाही. हातामध्ये काहीतरी खात्रिशिर कागदपत्रे आल्यानंतरच याबाबत बोलणे उचित ठरणार आहे. व्हिव्हिपॅट मतमोजणीसाठी अर्ज दिले आहेत. त्याबाबत कालावधी देणे आवश्यक आहे.
प्रबळ विरोधी पक्षनेताच नाही
लोकसभा आणि राज्यसभेमध्ये विरोधी पक्ष प्रभावी आहे. सभागृहाचे काम चांगल्या पद्धतीने सुरु आहे. मात्र मोठ्या राज्यांमध्ये विरोधी पक्षच राहू नये अशी खबरदारी सरकारकडून घेण्यात येत आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यांच्या निकालावरुन असेच दिसत असल्याची टिका शरद पवार यांनी केली.
शपथविधीसाठी फोन आला…
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण आपणास आले होते. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांचाही फोन आला होता. पण त्यांना मी शुभेच्छा देवून सांगितले की, संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे मी येवू शकणार नाही.
अजितदादांबद्दल सरकारच भाष्य करेल
अजित पवार यांची मालमत्ता परत देण्याचे आदेश नुकतेच देण्यात आले आहेत. ज्यांनी अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यांनीच लोकांसमोर स्वच्छ चित्र मांडावे असे भाष्य शरद पवार यांनी केले. अजितदादांबद्दल सरकारच बोलेल असेह त्यांनी सांगितले.
रोहित पवारांनीच रोहित पाटलांचे नाव सुचविले
रोहित पाटील यांना पक्षात जबाबदारी दिल्यावरुन रोहित पवार नाराज नाही आहेत. रोहीत पवारांनीच रोहित पाटील यांचे नांव सुचविले होते, तसेच त्यांच्या नावाला अनुमोदनही दिले होते. रोहित पाटील यांच्यामध्ये स्वर्गिय आर. आर. पाटील यांचे सर्व गुण दिसत आहेत. त्यामुळेच त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढणार
आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महाविकास आघाडी म्हणून लढणार आहे. पराभवाची चिंता करायची नसते, पराभवानंतर लोकांच्यात जायचे असते. आज लोक अस्वस्थ आहेत. लोकांमध्ये उत्साह दिसत नाही, महाराष्ट्रात विजयाचे वातावरण नसल्याचेही त्यांनी सांगितले. समाजवादी पार्टीचे अबु आझमी हे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार म्हणत असले तरी, त्यांचे राष्ट्रीय पातळीवरील नेते महाविकास आघाडीसोबतच असल्याचेही पवार यांनी सांगितले.








