ऑस्ट्रेलियाच्या गुप्तचर प्रमुखांचे वक्तव्य : भारतावरील आरोपांचे प्रकरण
वृत्तसंस्था /कॅनबरा
ऑस्ट्रेलियाच्या गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांनी कॅनडाकडून भारतावर करण्यात आलेल्या आरोपांवर स्वत:ची सहमती व्यक्त केली आहे. कॅनडाकडून आरोप करण्यात आल्याच्या एक महिन्यांनी ऑस्ट्रेलियन सुरक्षा गुप्तचर संघटनेचे संचालक माइक बर्गेस यांनी कॅनडाच्या दाव्यांबद्दल वाद निर्माण होण्याचे कुठलेच कारण नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी ही टिपपणी अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात आयोजित 5 देशांची गुप्तचर संघटना फाइव्ह आईजच्या बैठकीत केली आहे.
फाइव्ह आईजमध्ये ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अमेरिका, ब्रिटन आणि न्यूझीलंड या देशांचा समावेश आहे. हे सदस्य देश परस्परांसोबत महत्त्वपूर्ण गुप्तचर माहिती सादर करत असतात आणि सुरक्षा प्रयत्नांमध्येही सहकार्य करतात. कॅनडा सरकारने भारत सरकारवर केलेल्या आरोपांप्रकरणी प्रश्न उपस्थित करण्याचे कुठलेच कारण नसल्याचे बर्गेस यांनी म्हटले आहे. जर एखाद्या देशावर दुसऱ्या दशाच्या नागरिकाच्या हत्येचा आरोप झाल्यास तो गंभीर मानला जावा. अशाप्रकारचे कृत्य आम्ही करत नाही आणि अन्य देशांनीही अशाप्रकारचे कुठलेही काम करू नये असे वक्तव्य बर्गेस यांनी केले आहे.
ऑस्ट्रेलिया भारतीय हस्तकांचे पुढील लक्ष्य असू शकते का असा प्रश्न बर्गेस यांना विचारण्यात आला होता. असे घडेल की नाही हे मी सार्वजनिकपणे सांगू शकणार नाही, कारण यावर बोलणे योग्य नसल्याचे माझे मानणे आहे. परंतु अन्य देशाचे सरकार आमच्या देशात हस्तक्षेप करत असल्याचे किंवा याची योजना तयार करत असल्याचे कळल्यावर आम्ही प्रभावीपणे त्याला सामोरे जाऊ हे सांगू इच्छितो असे बर्गेस यांनी उत्तरादाखल सांगितले आहे. ऑस्ट्रेलियातील कट्टरवाद्यांनी भारत सरकारबद्दल भीती बाळगण्याची गरज आहे का अशी विचारणाही करण्यात आली होती. यावर बर्गेस यांनी याचे उत्तर तुम्ही भारतालाच विचारणे योग्य ठरेल अशी टिप्पणी केली आहे. लोकांना लपून नुकसान पोहोचविणे आणि इतरांच्या विषयांमध्sय हस्तक्षेपाचे काम देशांचे नाही आणि जर असे काही घडले तर ऑस्ट्रेलिया कारवाई करणार असल्याचे बर्गेस यांनी नमूद पेले आहे.
मागील महिन्यात भारतावर आरोप
हरदीप सिंह निज्जर या खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येत भारत सरकारच्या हस्तकांचा हात होता असा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी अलिकडेच केला होता. भारताने कॅनडाच्या या आरोपांना फेटाळून लावले होते. या आरोपानंतर दोनही देशांमध्ये राजनयिक पातळीवर तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशांनी परस्परांच्या अनेक मुत्सद्द्यांना परत पाठविले आहे. निज्जरला भारताने 2020 मध्ये दहशतवादी घोषित पेले होते. जून महिन्यात ब्रिटिश कोलंबियात निज्जरची हत्या करण्यात आली होती.









