► वृत्तसंस्था / हैद्राबाद
संध्या चित्रपटगृहात पुष्पा-2 या चित्रपटाच्या प्रथम प्रदर्शनाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ज्या आपल्या चाहतीचा मृत्यू झाला तिच्यासंबंधात आपल्याला मोठे दु:ख वाटत आहे. तथापि, या मृत्यूला मी थेट उत्तरदायी नाही, असे प्रतिपादन प्रसिद्ध तेलगू अभिनेता अल्लू अर्जुन याने पेले आहे. या प्रकरणात त्याला शुक्रवारी अटक करण्यात आली होती. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीही देण्यात आली होती. तथापि, उच्च न्यायालयाने त्याला चार आठवड्यांचा अंतरिम जामीन संमत केल्याने त्याची शनिवारी सकाळी कारागृहातून सुटका करण्यात आली.
सुटका झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी राज्यभर प्रचंड जल्लोष केला. अनेक चाहते त्याची सुटका होईपर्यंत रात्रभर कारागृहाबाहेर बसून होते. त्याला घाईगडबडीने अटक केल्यामुळे तेलंगणातील काँग्रेस सरकारवरही अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. तथापि, मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी त्याच्या अटकेचे समर्थन केले.
चेंगराचेंगरी प्रशासनामुळेच ?
संध्या चित्रपटगृहात पुष्पा-2 च्या प्रथम प्रदर्शनासाठी अल्लू अर्जुन येणार आहे, याची माहिती चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनाला देण्यात आली होती. तसेच व्यवस्थापनानेही हैद्राबाद पोलीसांना पत्र पाठवून सुरक्षा व्यवस्थेची मागणी या कार्यक्रमाच्या जवळपास 18 तास आधी केली होती. तथापि, प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली नाही आणि त्यामुळे ही दुर्घटना घडली असा आरोप अल्लू अर्जुन याच्या अनेक चाहत्यांनी इंटरनेटवर केला आहे.
अनुमती घेतली होती
अल्लू अर्जुन याने चित्रपटगृहाला अचानक भेट दिली असा आरोप प्रथम केला गेला होता. तथापि, चित्रपटगृहाच्या प्रशासनाने या कार्यक्रमासाठी आणि त्याच्या उपस्थितीची कल्पना प्रशासनाला देऊन आधी अनुमती घेतली होती, असे आता उघड होत आहे. त्यामुळे हे एकंदर प्रकरणच अधिक गंभीर झाले आहे.









