शेतकरी-ग्रामस्थांची मागणी : अन्यथा आंदोलनाचा इशारा
बेळगाव : कणबर्गी बसस्टॉपनजीकच्या तलावाचे काम पुन्हा हाती घेण्यात आले आहे. सदर तलावात गावातील शेतकऱ्यांकडून जनावरे व बकरी सोडली जातात. त्यामुळे सदर तलावात कोणत्याही प्रकारची विकासकामे हाती घेण्यात येऊ नये. अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शेतकरी व ग्रामस्थांनी दिला आहे. यापूर्वी माजी आमदार अनिल बेनके यांनी कणबर्गी गावातील बसस्टॉपनजीकच्या तलावाचा विकास करण्यासाठी निधी मंजूर केला होता. सदर तलावावर गावातील जनावरे व बकरी अवलंबून आहेत. जनावरे धुण्यासह पाणी पिण्यासाठी त्या ठिकाणी शेतकरी जनावरे घेऊन जातात. गावात जनावरांची संख्या अधिक आहे. गावात एकूण 15 दूध डेअऱ्या आहेत. जनावराबाबत समस्या निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना स्मार्टसिटी कार्यालयावर मोर्चाही काढला होता. त्यानंतर तलावात जनावरे व बकरी जाण्यासाठी दोन ठिकाणी रस्ता करून देण्यात आला आहे. यानंतर आता पुन्हा आमदार निधीतून मनपाकडून तलावात काही विकासकामे हाती घेतली आहेत.
अन्य तलावावर विकासकामे राबवा
शोभेचे दिवे बसविण्याचे काम सुरू आहे. पण सध्या सदर तलावात कोणत्याही प्रकारचे विकासकाम करण्यात येऊ नये, गावातील अन्य चार तलावांमध्ये कोणतीही कामे करण्यास आपला विरोध नाही. पण बसस्टॉपनजीकच्या तलावात कोणतेही विकासकामे हाती घेऊ नये, अन्यथा ग्रामस्थ व शेतकऱ्यांतर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला आहे. कणबर्गी गावातील तलावाला काही जण रामतीर्थनगरचे नाव देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पण या तलावाला कोणत्याही परिस्थितीत रामतीर्थनगरचे नाव देण्यात येऊ नये, अशी मागणीही केली जात आहे.









