निज्जर हत्येप्रकरणी जयशंकर यांचे कॅनडाला खडेबोल
वृत्तसंस्था /लंडन
विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येवरून भारतावर आरोप करणाऱ्या कॅनडाकडून पुन्हा एकदा पुराव्यांची मागणी केली आहे. निज्जरच्या हत्येप्रकरणी चौकशी आवश्यक असल्याचे भारत नाकारत नाही. परंतु कॅनडाने स्वत:च्या आरोपांच्या समर्थनार्थ पुरावे सादर करावेत. हत्येमागे भारतीय हस्तकांचा हात असल्याचा आरोप करत असाल तर त्याचे पुरावे देखील कृपया सादर करा अशा शब्दांत जयशंकर यांनी लंडन येथील एका कार्यक्रमात कॅनडा सरकारला सुनावले आहे. जयशंकर यांनी लंडनमध्ये वरिष्ठ पत्रकार लियोनेल बार्बर यांच्यासोबत आयोजित एका कार्यक्रमात प्रश्नांच्या उत्तरादाखल ही टिप्पणी केली आहे. कॅनडाने स्वत:च्या आरोपाच्या समर्थनार्थ कुठलेच पुरावे भारतासमोर मांडलेले नाहीत असे जयशंकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबियात 18 जून रोजी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची हत्या झाली होती. या हत्येमागे भारतीय हस्तकांचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला होता. यामुळे भारत आणि कॅनडाचे संबंध तणावपूर्ण झाले आहेत. भारताने 2020 मध्ये निज्जरला दहशतवादी घोषित केले होते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य एका निश्चित जबाबदारीसोबत येते आणि त्या स्वातंत्र्याचा गैरवापर चुकीचा आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा राजकीय उद्देशांसाठी होणाऱ्या दुरुपयोगाला सहन करणे अत्यंत चुकीचे ठरणार असल्याचे जयशंकर यांनी कॅनडातील खलिस्तानी कारवायांचा उल्लेख करत म्हटले. कॅनडातील भारतीय दूतावासावर हल्ला, महावाणिज्य दूतावासावर बॉम्ब हल्ल्यांचा जयशंकर यांनी उल्लेख केला. भारतीय मुत्सद्दी अधिकाऱ्यांना जाहीरपणे धमकाविण्यात आले. तरीही कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हेगारांवर कुठलीच कारवाई केली नसल्याचे जयशंकर यांनी निदर्शनास आणून दिले. कॅनडा भारतासोबत आता कुठल्याही प्रकारचा संघर्ष इच्छित नाही. परंतु निज्जरच्या हत्येप्रकरणी तपास होणे आवश्यक असल्याचे ट्रुडो यांनी मागील आठवड्यात म्हटले होते.









