कोलंबो / वृत्तसंस्था
श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्या विरोधात मांडण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव त्या देशाच्या संसदेने फेटाळला आहे. राजपक्षे यांना हा मोठाच दिलासा मिळाला आहे. सध्या त्यांच्या विरोधात श्रीलंकेत उग्र निदर्शने होत असून लोकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. श्रीलंकेच्या आतापर्यंतच्या सर्वात भीषण आर्थिक संकटासाठी त्यांना जबाबदार धरण्यात येत आहे. मात्र, बहुसंख्य संसद सदस्यांचा विश्वास त्यांनी राखला आहे.
तामिळ नॅशनल अलायन्स या विरोधी पक्षांच्या युतीने हा अविश्वास प्रस्ताव मांडला होता. समागी जन बलवेगाया या पक्षाच्या सदस्यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. मात्र, श्रीलंकेच्या नवनियुक्त सरकारचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे व त्यांच्या पाठीराख्यांनी या प्रस्तावाला विरोध करुन त्याच्या विरोधात मतदान केले होते. जनभावना व्यक्त करण्यासाठी हा प्रस्ताव मांडण्यात आला होता, असे नंतर विरोधी पक्षांच्या युतीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.









