चुये :
हणबरवाडी तालुका करवीर येथील ग्रामपंचायतचे विद्यमान लोकनियुक्त सरपंच कुमार उर्फ आबासो मारुती कोराने यांच्या विरोधात दाखल केलेला अविश्वास ठराव ग्रामसभेत झालेल्या मतदानात 162 मतांनी मंजूर करण्यात आला .अत्यंत चुरशीच्या वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली ठरावाच्या बाजूने 435 मते पडली तर ठरावाच्या विरोधात 273 मते नोंदली . तर 45 मते बाद ठरली .निवडणूक अधिकारी म्हणून करवीर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ संदीप भंडारे यांनी काम पाहिले .
सरपंचांच्या विरोधात अविश्वास ठराव आणि त्यासाठी ग्रामसभेचे मतदान हा प्रसंग ग्रामस्थांना पहिल्यांदाच अनुभवायला मिळाला त्यामुळे गावातील वातावरण सकाळपासूनच तणावाचे होते त्यामुळे अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाकडून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता . ग्रामसभेला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली .ग्रामसभेला उपस्थित नागरिकांनी नोंदणी केली .सकाळी 11 पर्यंत नोंदणी घेण्यात आली त्यानंतर अकरा ते चार या वेळेत मतदान घेण्यात आली मतदान प्रक्रियेमध्ये ठरावाच्या बाजूने शून्य चिन्ह तर ठरावाच्या विरोधात त्रिकोण चिन्ह मतपत्रिकेवरती देण्यात आले .अविश्वास ठरावाचे वातावरण गेली महिनाभर गावात सुरू आहे त्यामुळे गावातील गटातटाचे राजकीय वातावरण चांगले तापलेले होते .त्यामुळे सकाळपासूनच नागरिकांनी ग्रामसभा हजर नोंदणी आणि त्यानंतर मतदान यासाठी मोठी गर्दी केली होती दुपारी दोन पर्यंत चुरशीने मतदान झाले त्यानंतर मतदान प्रक्रियेत संत गती आली दुपारी चार वाजता मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली .
चार नंतर मतमोजणी घेण्यात आली .ग्रामसभेला 764 नागरिकांची नोंदणी झाली मात्र मतदानाच्या वेळेत 753 नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला त्यामध्ये अविश्वास ठरावाच्या बाजूने 435 मते नोंदणी तर अविश्वास ठरावाच्या विरोधात 273 मते नोंदली .45 मध्ये अवैद्य ठरली .त्यामुळे 162 मतांनी सरपंचांच्या विरोधातील अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला .
2022 मध्ये ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक पार पडली त्यामध्ये ज्योतिर्लिंग विकास आघाडीने चार जागा जिंकल्या तर महालक्ष्मी ग्रामविकास आघाडीने तीन जागा जिंकल्या लोकनियुक्त सरपंचा पदाच्या लढतीत ज्योतिर्लिंग विकास आघाडीचे कुमार उर्फ आबासो मारुती कोराने यांनी विजयश्री खेचून आपली निवड सार्थ ठरवली त्यामुळे सभागृहात लोकनियुक्त सरपंचासह सत्ताधारी आघाडीचे पाच संख्या बळ होते तर विरोधी आघाडीचे तीन संख्याबळ होते . गेल्या अडीच वर्षात सर्वांनी गट तट विसरून गावच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले त्यामुळे निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात मात्र विकासासाठी एकत्र असे वातावरण ग्रामस्थांना अडीच वर्षे पाहायला मिळाले मात्र अडीच वर्षाचा कालखंड पूर्ण झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे राजीनामा द्यावा अशी मागणी सत्ताधारी गटातील सदस्यांनी व्यक्त केली मात्र लोकनियुक्त सरपंच कुमार कोराने यांनी मला गटाचा आदेश नाही त्यामुळे मी राजीनामा देऊ शकत नाही ही भूमिका घेतली त्यामुळे नाराज झालेल्या सदस्यांनी विरोधी तीन सदस्यांच्या बरोबर एकत्र येण्याचा निर्णय घेत सरपंच कोराने यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला सदस्य सभेत दोन विरुद्ध सहा असा अविश्वास ठराव मंजूर झाला मात्र त्याला अंतिम स्वरूप ग्रामसभेतच दिले जाते त्याप्रमाणे आज ग्रामसभा होऊन मतदान प्रक्रिया पार पडली त्यामध्ये 162 मतांनी अविश्वास मंजूर झाला.
- तालुक्यातील पाचवे गाव
सरपंचांच्या विरोधातील सदस्यांनी आणलेला अविश्वास ठराव अधिकृत करण्यासाठी बोलवलेली ग्रामसभा आजची तालुक्यातील पाचवी ठरली . त्यामुळे पाचवा क्रमांक हाणबरवाडीचा लागला यापूर्वी तालुक्यात सावरवाडी हिरवडे खालसा कसबा बीड बहिरेश्वर आणि त्यानंतर आज हणबरवाडीची त्यामध्ये भर पडली.








