अकरा विरुद्ध चार मतांनी ठराव संमत : अध्यक्ष रामनिंग मोरे दीड वर्षातच अध्यक्षपदावरून पायउतार
वार्ताहर/कणकुंबी
जांबोटी जिल्हा पंचायत व्याप्तीतील सर्वात मोठी ग्राम पंचायत असलेल्या बैलूर ग्राम पंचायतीच्या अध्यक्षांवरील अविश्वास ठराव बुधवारी अकराविरूद्ध चार मतांनी मंजूर झाला. त्यामुळे विद्यमान अध्यक्ष रामनिंग ओमानी मोरे यांना दीड वर्षातच अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले आहे. बैलूर ग्रा. पं. अध्यक्ष रामलिंग ओमानी मोरे (तीर्थकुंडये) यांच्या विरोधात 24 डिसेंबर रोजी बेळगाव जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार बुधवार दि 22 जानेवारी 2025 रोजी खानापूर तालुका पंचायत प्रभारी कार्यनिर्वाहक अधिकारी व असिस्टंट कमिशनर दिनेश कुमार मिना यांच्या उपस्थितीत अविश्वास ठरावावर मतदान घेण्यात आले.
याप्रसंगी ग्रामपंचायत विकास अधिकारी सुनील अंबारे व इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी एकूण पंधरा सदस्यांपैकी अध्यक्षांच्या विरोधात अकरा मते पडली तर अध्यक्षांच्या बाजूने केवळ चार मते पडली. त्यामुळे अकराविरूद्ध चार मतांनी ठराव संमत झाला. माजी जिल्हा पंचायत सदस्य लक्ष्मण बामणे यांच्या पत्नीचे काही दिवसांपूर्वी निधन झाल्याने एक जागा रिक्त आहे. त्यामुळे विद्यमान अध्यक्षांना दीड वर्षातच पायउतार व्हावे लागले. आता नूतन अध्यक्षांची निवड येत्या आठ दिवसात होणार असून उर्वरित काळासाठी आता अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्dयात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
सदस्यांना विश्वासात न घेतल्याने अविश्वास ठराव दाखल
बैलूर ग्रामपंचायतीमध्ये बैलूर, कुसमळी, तीर्थकुंडे, उचवडे, तीर्थकुंडये गवळीवाडा, देवाचीहट्टी, मोरब आणि मोरब गवळीवाडा अशा एकूण आठ गावांचा समावेश आहे. खानापूर तालुक्यात ग्रामपंचायत स्तरावर व स्थानिक राजकारणात पक्ष विरहित राजकारण व निवडणुका होत असतात. बैलूर ग्राम. पंचायत अध्यक्ष रामलिंग मोरे यांनी सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन काम केलं नसल्याने त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. त्यामुळेच अध्यक्षांना पायउतार व्हावे लागले अशी चर्चा बैलूरसह जांबोटी भागात होत आहे.









