राजपक्षेंना हटवण्यासाठी जनता रस्त्यावर
कोलंबो / वृत्तसंस्था
श्रीलंकेतील आर्थिक संकट दिवसेंदिवस वाढत असताना, 19 एप्रिलला संसदेचे अधिवेशन बोलावले जाऊ शकते. यामध्ये राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला जाऊ शकतो. याबाबत रविवारी विरोधी पक्षांची बैठक झाली. श्रीलंकेतील मुख्य विरोधी पक्ष समागी जन बालवेगया यांनी आर्थिक संकटामुळे गोटाबाया सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची घोषणा केली आहे. श्रीलंकेचा मुख्य तामिळी पक्ष, ‘तामिळ नॅशनल अलायन्स’ने राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी विरोधकांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे.
विरोधक संसदेत खासगी विधेयक सादर करणार असून त्यामध्ये राष्ट्रपतींचे अधिकार काढून घेण्याच्या दुरुस्तीचा समावेश असेल, असे श्रीलंकेच्या संसदीय गटाने सांगितले. दुसरीकडे, राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी रविवारी संध्याकाळी माजी पंतप्रधान मैत्रीपाल श्रीसेना यांच्या नेतृत्वाखालील श्रीलंका फ्रीडम पार्टीसोबत बैठक घेतली. तत्पूर्वी, श्रीलंका सरकारमधील 11 सदस्यांनी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांना हटवून नवीन मंत्रिमंडळ स्थापन करण्याचे आवाहन करणारे पत्र लिहिले आहे.
सरकारविरोधात जनता रस्त्यावर
श्रीलंका आजवरच्या सर्वात भीषण आर्थिक संकटाला तोंड देत आहे. देशातील परिस्थिती चिघळत चालल्याने तामिळ नॅशनल अलायन्स या पक्षानेही राष्ट्रपतींच्या विरोधात आवाज बुलंद केला आहे. आता सर्वसामान्य जनताही रस्त्यावर उतरली आहे. 10 हजारांहून अधिक निदर्शक गॅले फेस ग्रीन अर्बन पार्कवरील आंदोलनात सहभागी झाले आहेत. दीर्घकाळ चालणारी वीजकपात, तसेच इंधन, अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा याविरुद्ध लोक गेले अनेक आठवडे निदर्शने करत आहेत.
19 लंकन नागरिकांचा तामिळनाडूत आश्रय
श्रीलंकेत सुरू असलेल्या आर्थिक संकटामुळे अनेकांना आपला देश सोडावा लागला आहे. जाफना आणि मन्नार येथील 19 श्रीलंकन तामिळी नागरिक बोटीने तामिळनाडूतील धनुषकोडी येथे रविवारी पोहोचले. गंभीर आर्थिक संकटामुळे श्रीलंकेत राहणे कठीण झाले आहे. श्रीलंकेत खाण्यापिण्यात प्रचंड वाढ झाल्याचे या लोकांचे म्हणणे आहे. कठीण परिस्थितीमुळेच आपण भारतातात आश्रय घेतल्याचे या लोकांनी सांगितले.
माजी पंतप्रधानांनी मानले भारताचे आभार
श्रीलंकेचे माजी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी कठीण काळात मदत केल्याबद्दल भारताचे आभार मानले आहेत. भारताने आम्हाला खूप मदत केली आहे. आर्थिक सोबतच ते आम्हाला इतर मार्गानेही मदत करत आहेत. आपण त्यांचे ऋणी असले पाहिजे, असे विक्रमसिंघे यांनी म्हटले आहे.









