पुणे / प्रतिनिधी :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मागील निवडणूकीत शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी झाला. जर राष्ट्रवादीला शिवसेना सत्तेत चालत असेल तर भाजप सुद्धा चालू शकतो. आत्ताच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीने सहभाग घेतला तरी पक्षाची मुख्य विचारधारेशी तडजोड केली जाणार नाही. शाहू, फुले, आंबेडकरांची सर्वधर्मसमभावाची आमची विचारधारा असल्याचे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष (अजित पवार गट) खासदार सुनील तटकरे यांनी शनिवारी येथे मांडले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे शहर कार्यकारिणीतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना तटकरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले. यावेळी तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दिपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, माजी महापौर दत्ता धनकवडे, राजलक्ष्मी भोसले व आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.तटकरे म्हणाले, भिन्न विचारधारेच्या पक्षांसोबत सत्तेत सहभागी झाल्याने सुरूवातीला आमचा विचार पुढे घेऊन जाताना थोडं जड जाईल. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकासाला आणि गतिमान महाराष्ट्रासाठी आम्ही महायुतीत सहभागी झालो आहोत. सन २०१९ ला शिवसेनेविरोधात राष्ट्रवादी लढली. त्यानंतर याच शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी व्हाव लागलं. त्यामुळे आत्ताच्या भाजपसोबत सत्तेत आल्याने काही वेगळं वाटायचे कारण नाही. राष्ट्रवादीची मुळ विचारधारा ही धर्मनिरपेक्षतेची आहे. हीच विचारधारा कायम राहील.
पंतप्रधान मोदींनी ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाली या आरोपावर बोलताना तटकरे म्हणाले, आत्तापर्यंत राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले. ही प्रकरणे न्यायालयात गेली. न्यायालयाने यावर निर्णय दिला. त्यामुळे या विषयावर फार काही बोलणार नाही.नवाब मलिक प्रकरणात न्यायालयाने निर्णय दिला आहे. त्यामुळे नवाव मलिक यांना मिळालेल्या जामिनाचा आणि राष्ट्रवादीचा सत्तेत येण्याचा दुरान्वये संबंध नाही, असे सांगत विरोधी पक्षनेते पदाची धुरा हाती घेतल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी सुरू केलेल्या आरोपांवरून तटकरे म्हणाले, वडेट्टीवार हे नव्यानेच विरोधी पक्ष नेते झाले आहेत. एखादे पद मिळाल्यानंतर माध्यमांसमोर येऊन सनसनाटी वक्तव्ये केल्याने प्रसिद्धी मिळत असते. त्यातुन वडेट्टीवार अशी विधाने करीत असावेत, अशी टिप्पणी तटकरे यांनी केली.