चीनसोबतच्या भूतानच्या करारावरून भारताचा सतर्कतेचा इशारा : डोकलामवरून बीजिंगमध्ये चर्चा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चीनच्या दबावाखाली येत डोकलाम कॉरिडॉरवरून तडजोड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भूतानला भारत सरकारने सतर्क केले आहे. डोकलामसारख्या संवेदनशील मुद्द्यांवर कुठल्याही प्रकारच्या तडजोडीच्या विरोधात असून सीमा वादाच्या कुठल्याही तोडग्यामुळे आमच्या हितसंबंधांवर प्रभाव पडू नये असे भारताने बजावले आहे.
राजनयिक संबंध प्रस्थापित करणे आणि सीमा वादावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी चीन आणि भूतान चर्चा करत आहेत. यावरून चीनचे विदेशमंत्री वांग यी आणि भूतानचे विदेशमंत्री टांडी दोर्जी यांच्यात बीजिंगमध्ये चर्चा पार पडली आहे. यादरम्यान चीनने भूतानला पूर्ण राजनयिक संबंध प्रस्थापित करणे आणि वादांवर तोडगा काढण्याचा आग्रह केला आहे.
दोन्ही देशांदरम्यान सीमा वादावर लवकरात लवकर तोडगा काढण्यावर सहमती झाली आहे. राजनयिक संबंधांची बहाली दोन्ही देशांच्या दीर्घकालीन हिताची ठरणार असल्याचे चीनच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे. चीनकडून भूतानच्या सुमारे 764 चौरस किलोमीटर भूभागावर दावा केला जात आहे.
भूतानला केले सतर्क
भारत डोकलाम कॉरिडॉर सारख्या संवेदनशील मुद्द्यांवर कुठल्याही प्रकारच्या तडजोडीच्या विरोधात आहे. सीमा वादावरील कुठल्याही तोडग्यामुळे भारताच्या हितसंबंधांवर प्रभाव पडू नये असे मोदी सरकारने भूतानला सांगितले आहे. 2017 मध्ये चिनी सैन्याने डोकलाम क्षेत्रात रस्तेनिर्मिती सुरू केल्यावर भारतीय सैन्याने हा प्रयत्न हाणून पाडला होता. यामुळे दोन्ही देशांदरम्यान दीर्घकाळ सैन्य तणाव निर्माण झाला होता. भूतान हा भारताचा सर्वात निकटचा सहकारी आहे. भारत आणि भूतान या दोन देशांसोबतच चीनचा सीमा वाद सुरु आहे. उर्वरित सर्व शेजारी देशांसोबतचा सीमावाद चीनने निकाली काढला आहे.
डोकलाम भारतासाठी संवेदनशील मुद्दा
डोकलाम पठार हे भारत, भूतान आणि चीनच्या एका त्रिकोणावर स्थित आहे. याच्या पर्वतीय भागावर भूतान आणि चीन दोन्ही देश स्वत:चा दावा सांगत आहेत. भारत भूतानच्या दाव्याचे समर्थन करतो. डोकलामवर चीनचे नियंत्रण थेट स्वरुपात भारताच्या सुरक्षाविषयक हितसंबंधांना धक्का पोहोचविणारे ठरणार आहे. चीन भूतानच्या क्षेत्रात घुसखोरी करत भारतासमोर सुरक्षाविषयक आव्हान निर्माण करू पाहत आहे. डोकलाम पठार हे भारताच्या सिलिगुडी कॉरिडॉरच्या नजीक आहे. हा कॉरिडॉर भारतासाठी सामरिक महत्त्वाचा असून तो ईशान्येतील राज्यांना देशाच्या अन्य भागांशी जोडणारा आहे.









