हरियाणातील गुरुग्राम येथील एक कारखाना सध्या बऱ्याच चर्चेत आहे. या कारखान्याचे नाव ‘कंट्रोल झेड’ असे आहे. याचे वैशिष्ट्या असे आहे, की त्याचे बांधकाम पूर्णत: बांबू आणि माती यांच्या साहाय्याने करण्यात आले आहे. या कारखान्याच्या बांधकामात कुठेही विटा किंवा सिमेंट यांचा उपयोग करण्यात आलेला नाही. युग भाटिया हे या कारखान्याचे चालक आणि स्वामी असून ते पर्यावरणप्रेमी असल्याने त्यांनी या कारखान्याची रचनाही पर्यावरण संवर्धनाला अनुकूल अशीच केली आहे. या कारखान्यात मोबाईल फोनच्या दुरुस्तीचे काम चालते. तसेच जुन्या मोबाईल्सचे रुपांतर नव्या मोबाईल्समध्ये केले जाते.
भाटिया जुने मोबाईल हँडसेट विकत घेतात. त्यांचा कायापालट करुन नवे मोबाईल हँडसेट त्यांच्यापासून बनवितात. त्यांचा हा व्यवसाय जोरात चालला आहे. त्यांनी आपल्या कारखाना पर्यावरणस्नेही साधनांपासूनच निर्माण करण्याचे प्रारंभापासूनच ठरविले होते. त्यानुसार तो त्यांनी केवळ बांबू आणि मातीच्या उपयोगाने साकारला आहे. काही स्थानी यात लाकडाचाही उपयोग करण्यात आला आहे. तथापि, पर्यावरणाला हानी पोहचेल अशा कोणत्याही सामग्रीचा उपयोग करण्यात आलेला नाही. केवळ कारखान्याची निर्मितीच पर्यावरणस्नेही आहे, असे नाही, तर या कारखान्यात ते जे जुन्या मोबाईल्सचे पुनर्निर्माणकार्य किंवा रिसायकलींग करतात, तो त्यांचा व्यवसायही पर्यावरणस्नेही आहे.
नैसर्गिक सामग्रीपासून हा कारखाना निर्माण करण्यात आल्याने त्याच्या आतील तापमान उन्हाळ्याच्या दिवसांमध्येही कमी असते. त्यामुळे फॅन किंवा एसी बहुतेकवेळा लावावा लागत नाही. ही बाबही पर्यावरणाला पोषक अशीच आहे. अशा प्रकारचा कारखाना भारतात प्रथमच उभारण्यात आला आहे. त्यामुळे त्याची निर्मिती करत असताना भाटिया यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले होते. परदेशांमध्ये अशा प्रकारचे कारखाने असतात. पण भारतातील हा प्रथमच प्रयोग असल्याने या कारखान्याच्या आरेखनापासून ते प्रत्यक्ष निर्मितीपर्यंतचे प्रत्येक काम त्यांनाच लक्ष घालून करुन घ्यावे लागले. कारण भारतात अशी निर्मिती करणारे तज्ञ नाहीत. त्यांचा हा कारखाना गुरुग्राम भागात कौतुकाचा विषय ठरला आहे. त्याच्या मेंटेनन्सलाही पुष्कळ कमी खर्च येतो, असे भाटियांचे म्हणणे आहे.









