दोन न्यायाधीशांचे परस्परविरोधी निर्णय : प्रकरण सरन्यायाधीशांकडे
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्लीत 2020 मध्ये झालेल्या धार्मिक दंगलीतील आरोपी ताहीर हुसेन याला सर्वोच्च न्यायालयाने जामीन संमत करण्यास नकार दिला आहे. यासंबंधातील सुनावणी दोन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर झाली होती. त्यांच्यापैकी एक न्यायाधीश पंकज मित्तल यांनी त्याचा जामीन अर्ज फेटाळला. तर अन्य न्यायाधीश अहसानुद्दिन अमानुल्ला यांनी त्याचा जामीन अर्ज संमत केला. दोन न्यायाधीशांनी परस्पर विरोधी निर्णय दिल्याने आता हे प्रकरण सरन्यायाधीशांकडे जाणार आहे.
हुसेन हा सध्या कारागृहात आहे. त्याला दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी एआयएमआयएम या पक्षाने उमेदवारी दिली आहे. आपल्याला निवडणुकीचा प्रचार करावयाचा असल्याने जामीनावर आपली मुक्तता करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका त्याने सर्वोच्च न्यायालयात सादर केली होती. या याचिकेची सुनावणी या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर करण्यात आली होती.
मूलभूत अधिकार नाही
निवडणूक लढविणे हा कोणाचाही मूलभूत अधिक असू शकत नाही. हुसेन याच्यावर अत्यंत गंभीर आरोप आहेत. त्यामुळे त्याची तात्पुरत्या जामिनावर सुटका करण्याचे कोणतेही सबळ कारण नाही. आरोपीला निवडणूक लढवायची असेल तर तो ती कारागृहातूनही लढवू शकतो. निवडणुकीचा प्रचार करणे हे जामिनासाठी पुरेसे कारण नाही, असा युक्तिवाद दिल्ली पोलिसांच्या वतीने करण्यात आला. खंडपीठाच्या एका न्यायधीशांनी तो उचलून धरला. मात्र हा खंडीत आदेश असल्याने हे प्रकरण आता सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्याकडे जाणार आहे.









