वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पाकिस्तानची अण्वस्त्रे लपविलेल्या ‘किराना’ टेकड्यांवर भारताने हल्ला केलेला नाही, अशी स्पष्टोक्ती भारताचे सैनिकी कार्यवाही महासंचालक (डीजीएमओ) लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी केली आहे. यासंबंधी भारतावर केले जाणारे आरोप अत्यंत खोडसाळपणाचे आहेत. आम्ही अत्यंत अचूकपणे मारा केला असून कोणत्याही आण्विक केंद्राला धक्काही लावलेला नाही, असे प्रतिपादन त्यांनी सोमवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे. आणखी एक डीजीएमओ ए. के. भारती यांनीही हा आरोप फेटाळून लावला आहे.
पत्रकार परिषदेत त्यांना यासंबंधी प्रश्न विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सत्य परिस्थिती विशद केली. जी लक्ष्ये प्रारंभीच निर्धारित करण्यात आली होती, त्यांच्यावरच अचूक मारा करण्यात आला आहे. आम्ही पाकिस्तानचे कोणतेही अणुकेंद्र निवडले नव्हते. त्यामुळे यासंदर्भात जे बोलले जात आहे, त्या सर्व अफवा आहेत, असे ए. के. भारती यावेळी स्पष्ट केले.
कोठे आहेत किराना टेकड्या…
पाकिस्तानच्या सरगोधा वायुतळानजीक या किराना टेकड्या आहेत. भारताने आपल्या अचूक आणि भेदक हल्ल्यात सरगोधा येथील वायुतळावर अचूक मारा केला होता. त्यामुळे हा वायुतळ उद्ध्वस्त झाला आहे. या वायुतळावरील सर्व नियंत्रण यंत्रणा निकामी करण्यात आली आहे. सरगोधा वायुतळापासून 10 किलोमीटरच्या अंतरात या टेकड्या आहेत. काही युट्यूब चॅनेल्स आणि काही सोशल मिडिया वाहिन्यांवरून भारताने पाकिस्तानच्या या टेकड्यांवरील अणुबाँब साठ्यावरही हल्ले केले आहेत. त्यामुळे भेदरलेल्या पाकिस्ताने त्वरित शस्त्रसंधींच्या दिशेने पावले टाकावयास प्रारंभ केला. भारताच्या या विध्वसंक माऱ्यामुळे पाकिस्तानचा धीरच सुटला आणि तो गुढघ्यावर आला, अशा प्रकारची वृत्ते देण्यात येत आहेत. मात्र, ती वृत्ते सत्य नाहीत, असे प्रतिपादन भारती यांनी केले.
पाकिस्तान सैन्याविरोधात नाही…
प्रारंभी भारताचे सिंदूर अभियान पाकिस्तानच्या सैन्याच्या विरोधात नव्हते. ते केवळ पाकिस्तानच्या दहशतवाद्यांविरोधात होते. तथापि, पाकिस्तानच्या सैन्याने दहशतवाद्यांसाठी भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करून ते स्वत:वर ओढवून घेतले. जेव्हा पाकिस्तानच्या लष्करी यंत्रणेने दहशतवाद्यांच्या समर्थनार्थ भारतीय सेनेवर हल्ले करण्यास प्रारंभ केला, तेव्हा मात्र, आम्हाला पाकिस्तानच्या सेनेच्या विरोधात कारवाई करणे भाग पडले आहे. मग आम्ही जोरदार प्रतिहल्ला चढवून पाकिस्तानच्या लष्करी यंत्रणेची प्रचंड हानी केली. आमचे प्रत्येक क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या लक्ष्यांवर अचूक आदळले. त्यात जराही चूक न झाल्याने आमची उद्दिष्ट्यो सफल झाली आहेत, अशीही वस्तुस्थिती भारती यांनी स्पष्ट केली.
चीनची विमाने, क्षेपणास्त्रे धाराशायी
चीनने पाकिस्तानला आपली प्रसिद्ध पीएल-15 ही क्षेपणास्त्रे पुरविली होती. ही क्षेपणास्त्रे पाकिस्ताने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करताना उपयोगात आणली होती. मात्र, ती सर्व क्षेपणास्त्रे हवेतच उडविण्यात भारताला यश आले आहे. हा चीनलाही मोठा दणका आहे. भारताच्या सेनेने पीएल-15 या नष्ट झालेल्या क्षेपणास्त्राच्या तुकड्यांची छायाचित्रेही प्रसिद्ध करुन पराक्रम सिद्ध केला आहे. पाकिस्तानची काही जेएफ-17 विमानेही पाडविण्यात यश आले आहे. ही विमानेही चीनने पाकिस्तानला दिली होती. भारताच्या आकाश क्षेपणास्त्रांनी या विमानांचाही अचूक वेध घेत ती हवेतच नष्ट केली. पाकिस्तानचे एक मिराज-5 प्रकारचे विमानही नष्ट करण्यात आले असून त्याचे पुरावेही सादर केले गेले आहेत. तुर्कस्तानने पाकिस्तानला आपली सोनगार नामक ड्रोन्सही पुरविली होती. ती पाकिस्तानने हल्ल्यात उपयोगात आणली. तथापि, ती हवेतच नष्ट करण्यात भारत यशस्वी ठरला. पाकिस्तानने ही ड्रोन्स एकापाठोपाठ एक अशा चार स्तरांमध्ये डागली होती. तरीही काही उपयोग झाल्या असल्याचे दिसून आले नाही.









