वृत्तसंस्था/नवी दिल्ली
ऐतिहासिक रजपूत सम्राट राणा संग यांच्यासंबंधी वादग्रस्त विधान करणारे समाजवादी पक्षाचे राज्यसभा खासदार रामजीलाल सुमन यांनी त्यांच्या विधानासंबंधी क्षमायाचना करण्यास नकार दिला आहे. आपल्या वादग्रस्त विधानाच्या समर्थनार्थ त्यांनी जवाहरलाल नेहरु यांच्या पुस्तकाचा संदर्भ दिला असून या पुस्तकाच्या आधारावर आपले विधान योग्यच आहे, असे प्रतिपादन केले आहे. बाबराला सर्वजण दोष देतात. त्याला धर्मांध ठरवितात. तथापि, बाबराला भारतावर आक्रमण करण्याची सूचना त्यावेळच्या राजपुतान्यातील रजपूत सम्राट राणा संग यानेच केली होती, असे विधान सुमन यांनी केले होते. त्यामुळे प्रचंड गदारोळ निर्माण झाला आहे. सुमन यांच्याविरोधात एफआयआर सादर करण्यात आला असून त्यांच्या चौकशीची मागणी करणी सेनेने केली आहे.
क्षमायाचना करण्याची मागणी
रामजीलाल सुमन यांनी राणा संगासंबंधी केलेले विधान धादांत खोटे असून राणा संगाने कधीही बाबराला भारतावर हल्ला करण्याचा सल्ला दिला नव्हता. उलट स्वत: राणा संग यांचेच बाबराशी युद्ध झाले होते आणि त्या युद्धात राणा संग यांनी बाबराचा पराभव केला होता. ज्यांनी स्वत:च बाबराशी युद्ध केले होते, ते राणा संग बाबराला भारतावर हल्ला करण्याची सूचना करतीलच कशी, असा प्रश्न या संदर्भात अनेक इतिहासकारांनीही उपस्थित केला आहे. राणा संग यांनी बाबराला भारतावर हल्ला करण्यासाठी चिथावणी दिली, या आरोपाला कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही. बाबरनाम्यात या घटनेचा उल्लेख आहे. पण बाबरनामा या ग्रंथातील हा उल्लेख विश्वासार्ह नाही, असेही अभ्यासकांनी दाखवून दिले आहे.
कोण होते राणा संग
राणा संग हे इसवीसनाच्या सोळाव्या शतकातील एक थोर रजपूत सम्राट होते. त्यांनी विविध रजपूत घराण्यांमधील पिढ्यानपिढ्या चालत आलेली वैरे संपवून रजपूत समाजाला एकसंध करण्यात महत्वाची भूमिका साकारली होती. त्यांच्या काळात राजपुताना किंवा सध्याचा राजस्थानचा भाग अत्यंत प्रबळ सेनाशक्ती म्हणून नावारुपाला आला होता. त्यांनी मोंगलांपूर्वीच्या मुस्लीम सत्ताधीशांना अनेकदा पराभूत पेले होते. तसेच त्यांच्या आक्रमणांपासून राजपुतान्याचे संरक्षण केले होते. त्यांनी बाबराला भारतावर आक्रमण करण्याची सूचना केली असा आरोप केला जातो. पण त्याला दुजोरा देणारा कोणताही पुरावा नसल्याचे अनेक इतिहासकारांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सध्याच्या राजकारणात मात्र, त्यांच्यावर राजकीय हेतूने काही आरोप केले जात आहेत, असा प्रत्यारोप आहे.









