वृत्तसंस्था /पंजाब
पंजाब सरकारने सतलज यमुना लिंकच्या (एसवायएल) मुद्द्यावरून गुरुवारी तातडीची मंत्रिमंडळ बैठक बोलाविली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी कुठल्याही स्थितीत एक थेंब देखील अतिरिक्त पाणी कोणत्याही राज्याला देणार नसल्याचे सांगितले आहे. तसेच त्यांनी विधानसभेचे अधिवेशन बोलाविण्यावर चर्चा झाल्याची माहिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एसवायएल कालव्यावरून पंजाब सरकारला फटकारले होते. पंजाब सरकारने याप्रकरणी राजकारण करू नये. तसेच कठोर आदेश देण्यासाठी भाग पाडू नका, पंजाब सरकार कायद्यापेक्षा वरचढ नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. एसवायएल कालव्याद्वारे सतलज नदीचे पाणी यमुना नदीत सोडले जाणार आहे. या प्रकल्पाचा लाभ हरियाणा राज्याला होणार आहे. हरियाणा सरकारने या प्रकल्पाच्या निर्मितीकरता स्वत:च्या क्षेत्रातील काम जवळपास पूर्ण केले आहे. परंतु पंजाब सरकारने हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पुरेशी पावले उचलली नसल्याचा आरोप असून यासंबंधीचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे.









