चिपळूण :
शहरातील गुहागरनाका परिसरात वाशिष्ठी नदीकाठी १०० हून अधिक परप्रांतीय कामगारांनी अनधिकृत झोपड्या उभारल्या आहेत. याचे वृत्त- प्रसिद्ध झाल्यानंतर नगर परिषद प्रशासनाने केवळ पाहणी करत त्यांना झोपड्या हटवण्याच्या तोंडी सूचना दिल्या आहेत. मात्र यावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. येथे परवानगीशिवाय नळकनेक्शनही घेतल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे त्यांना आशीर्वाद कोणाचा? याची शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी संसाराच्या साहित्यासह हे कामगार येथे दाखल झाले आहेत. त्यांनी गुहागरनाका परिसरात वाशिष्ठी नदीकाठी झोपड्या उभारून राहण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे येथे कोणीतरी या झोपड्यांसाठी अनधिकृतपणे विजेची व्यवस्था केली आहे. तसेच परिसरात कोठेही सार्वजनिक शौचालय नसल्याने स्वच्छतेचे अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत.
त्यामुळे याबाबत तीन दिवसांपूर्वी ‘तरुण भारत संवाद’ने वृत्त प्रसिध्द केल्यानंतर नगर परिषदेच्या काही अधिकाऱ्यांनी येथे जाऊन पाहणी केली. तसेच येथून झोपड्या हटवण्याच्या तोंडी सूचना दिल्या. मात्र ठोस कोणतीही कारवाई झालेली नाही. उलट या झोपड्यांसाठी नगर परिषद परवानगीशिवाय नळकनेक्शनही घेतल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे अनधिकृत वीज, नळकनेक्शन अशा सुविधा झोपड्यांमध्ये कशा मिळाल्या, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.








