पाकिस्तानच्या माजी सैन्याधिकारी मान्य केले भारताचे सामर्थ्य : पाकिस्तानी वायुदलाच्या कमतरता केल्या स्पष्ट
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
भारतासोबत झालेल्या सैन्य संघर्षानंतर पाकिस्तानची सैन्य कमकुवता जगासमोर आली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि सैन्यप्रमुख आसीम मुनीर यांनी कितीही शेखी मिरविली तरीही पाकिस्तानात घुसून हल्ला करू शकतो आणि पाकिस्तानचे रणनीतिक तळ नष्ट करू शकतो हे भारताने दाखवून दिले आहे. भारताने 7 मे रोजी पाकिस्तानच्या विरोधात ऑपरेशन सिंदूर राबविले होते. यादरम्यान पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अ•s नष्ट करण्यात आले होते. यानंतर पाकिस्तानी सैन्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता भारतीय सैन्याने तो हाणून पाडला आणि मग प्रत्युत्तरादाखल कारवाई करत प्रमुख पाकिस्तानी वायुतळांचे मोठे नुकसान घडवून आणले होते.
ब्राह्मोसला घाबरतोय पाकिस्तान
भारताच्या शस्त्रास्त्रांचा सामना करण्याची क्षमता नसल्याचे आता पाकिस्तानी सैन्यतज्ञ मान्य करू लागले आहेत. पाकिस्तानकडे भारताच्या आकाशातून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांना रोखण्याची क्षमता नसल्याचा खुलासा पाकिस्तानी संरक्षण विश्लेषकांनी केला आहे. खासकरून ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्राच्या आकाशातून डागण्यात येणाऱ्या वर्जनचा पाकिस्तानी तज्ञांनी उल्लेख केला आहे. ब्राह्मोससारखे क्षेपणास्त्र रोखता येईल अशी कुठलीही हवाई सुरक्षा प्रणाली पाकिस्तानकडे सध्या नाही अशी कबुली संरक्षण तज्ञ इकरामुल्लाह भट्टी आणि पाकिस्तानी वायुदलाचे एअर कोमोडोर आदिल सुल्तान यांनी दिली आहे.
ब्राह्मोस ठरले भारताचे अचूक शस्त्र
भारतीय वायुदलाने अलिकडेच पाकिस्तानी वायुदलांवर हल्ला करण्यासाठी ब्राह्मोस क्षेपणास्त्रांचा वापर केला होता. ब्राह्मोस क्षेपणास्त्र स्वत:चा सुपरसोनिक वेग, अचूकता आणि 400 किलोमीटरपेक्षा अधिक पल्ल्यासह भारताच्या वायुदलाचे धोकादायक शस्त्र आहे. याच्या तैनातीमुळे भारतीय वायुदल शत्रूच्या हवाईक्षेत्रात प्रवेश न करता महत्त्वपूर्ण रणनीतिक लक्ष्यांचा वेध घेऊ शकते.
पाकिस्तानकडे नाही उत्तर
ब्राह्मोस क्षेपणास्त्राला आकाशातच रोखणारी कुठलीही प्रणाली पाकिस्तानकडे नाही. याचा वेग, प्रक्षेप पथ आणि कमी उंचीयुक्त प्रोफाइल याला वर्तमान प्रणालींसोबत सामोरे जाणे जवळपास अशक्य ठरविते असे पाकिस्तानी संरक्षणतज्ञ भट्टी यांनी म्हटले आहे. ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागण्यात आल्यावर प्रतिक्रियेसाठी खूपच कमी पर्याय शिल्लक राहतात असे पाकिस्तानचे माजी एअर कोमोडोर आदिल सुल्तान यांनी नमूद केले.
भारताचे ब्राह्मोस क्षेपणास्त्र पाकिस्तानसाठी अत्यंत मोठा धोका ठरले आहे. पाकिस्तान या क्षेपणास्त्राला प्रभावीपणे रोखण्यास असमर्थ आहे. अशास्थितीत त्याचे वायुतळ, कमांड सेंटर आणि रडार स्टेशन समवेत महत्त्वपूर्ण ठिकाणांना धोका निर्माण झाला आहे. ही कमजोरी समारे आल्याने पाकिस्तानला तातडीने पावले उचलणे भाग पडले आहे. परंतु पाकिस्तान या कमजोरीवर मात करत सुपरसोनिक क्षेपणास्त्रांना रोखण्याची क्षमता प्राप्त करू शकतो, अशास्थितीसाठी भारताला सज्ज रहायला हवे असे तज्ञांचे सांगणे आहे.









