हुकुमशहाची पत्नी-मुलीसोबत हजेरी
वृत्तसंस्था/ प्योंगयांग
उत्तर कोरियाने स्वतःच्या सर्वात शक्तिशाली क्षेपणास्त्राचे परीक्षण केले आहे. सॉलिड फ्यूलयुक्त आंतरखंडीय क्षेपणास्त्राच्या यशस्वी परीक्षणाला तेथील सरकारी माध्यमे चमत्कार ठरवत आहेत. या क्षेपणास्त्राच्या परीक्षणादरम्यान जपानच्या उत्तर भागातून लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. तर जपानच्या होकाएडोमध्ये शाळा विलंबाने सुरू करण्यात आल्या होत्या तसेच काही रेल्वेगाडय़ांच्या वेळेत बदल करण्यात आला होता.

या क्षेपणास्त्र परीक्षणादरम्यान उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन स्वतःची मुलगी आणि पत्नीसोबत उपस्थित होते. या क्षेपणास्त्राला उत्तर कोरियाने हवासोंग-18 नाव दिले आहे. परीक्षणादरम्यान या क्षेपणास्त्राने 1 हजार किलोमीटरपर्यंतपचा पल्ला गाठला आहे. या क्षेपणास्त्रात द्रव ऐवजी घन इंधनाचा वापर करण्यात आला आहे. सॉलिड फ्यूलवर संचालित होणारी क्षेपणास्त्रs अधिक सुरक्षित असतात. द्रव इंधनयुक्त क्षेपणास्त्रांमध्ये लाँचपूर्वी इंधन भरावे लागते, ज्याकरता मोठा वेळ लागत असतो. तर सॉलिड फ्यूलयुक्त क्षेपणास्त्रs जलदपणे डागता येत असल्याने त्यांना इंटरसेप्ट करणे अवघड असते. या क्षेपणास्त्र परीक्षणामुळे आमच्या शत्रूंमध्ये भीती निर्माण होणार असल्याचे विधान उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी केले आहे.









