काही दिवसांपूर्वी रिचर्ड ब्रन्सन आणि जगातील सर्वात श्रीमंत असणारे उद्योगपती जेफ बेजोस यांचा अंतरिक्ष प्रवास चांगलाच गाजला. बेजोस यांच्याबरोबर जगातील सर्वात वयस्कर अंतराळवीर 82 वर्षांचे वॅली फंक होते. ते अंतराळ प्रवास करणारे सर्वात वयस्कर ठरले आहेत. वयाची पन्नाशी पार केल्यानंतर उत्साह गमावणाऱया बहुसंख्य नागरिकांना हेवा वाटावा, अशीच ही उदाहरणे आहेत. भारतातही पंजाबमधील फिरोजपूर येथे राहणाऱया 61 वषीय रघुबीरसिंग खारा यांनी अंतराळात नाही तरी जमिनीवरच 56 दिवसांत 16 हजार किलोमीटरची मोटारसायकल यात्रा करून वृद्ध काळातही उत्साह कसा टिकून राहू शकतो, याचे उदाहरण घालून दिले आहे. 58 व्या वर्षी निवृत्त झाल्यानंतर त्यांनी एक साहस म्हणून मोटारसायकलवरून पाच देशांचा दौरा केला आहे.
नेपाळ, म्यानमार, थायलंड, मलेशिया आणि सिंगापूर अशा पाच देशांना भेटी देताना त्यांनी 16 हजारपेक्षा जास्त किलोमीटरचे अंतर पार केले. निवृत्तीनंतर केवळ घरात बसून विश्रांती न घेता किंवा गप्पा मारण्यात वेळ न घालवता काही तरी नवे करून दाखवायचे, या विचाराने ते झपाटले होते. त्यातून त्यांना मोटारसायकलवरून विदेश प्रवासाची कल्पना सुचली. ते नेहरू युवा केंद्रातून युथ को-ऑर्डिनेटर या पदावरून निवृत्त झाले आहेत. या पाच राष्ट्रांचा प्रवास करताना त्यांना भारतातीलही 11 राज्यांमधून जावे लागले आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, नागालँड व मणिपूर इत्यादी राज्यातून त्यांनी मोटारसायकलवरून तरुणाला लाजवेल, अशा उत्साहात प्रवास करून दाखविला. त्यांनी भेट दिलेल्या पाच देशांपैकी दोन देशांमध्ये उजव्या बाजूने वाहन चालविण्याचा नियम आहे. ही सवय त्यांना तेथे गेल्यानंतरच करून घ्यावी लागली. हा अनुभव अत्यंत वेगळा होता, असे ते म्हणतात. कोरोना काळानंतरच्या या यात्रेचे महत्त्व अनेक अर्थानी आपण अनुभवू शकलो, असे ते सांगतात.









