प्रतिनिधी,कोल्हापूर
निवारा टेस्ट्रामेंटरी ट्रस्ट फसवणूकीतील मुख्य संशयीत पूजा अजित भोसले-जोशी (रा. राजारामपुरी, तिसरी गल्ली, कोल्हापूर) हिने पुणे येथेही गंडा घातल्याचे समोर आले आहे. पुण्यातील काही नागरीकांना त्यांनी 25 लाख रुपयांना फसविल्याचे समोर आले आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात तिच्यावर 2021 मध्ये फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर निवारा टेस्ट्रामेंटरी ट्रस्टची प्रमुख पूजा भोसले-जोशी हिने चौकशीसाठी शाहूपुरी पोलिस ठाण्यातही हजेरी लावली. मात्र, जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताच ती गायब झाली आहे. तिचे मोबाइल नंबर बंद असल्याने ठावठिकाणा लागत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक चौकशीदरम्यान तिच्यावर पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली. 2021 मध्ये गुन्हा दाखल झाल्यापासून ती पसार असल्याची माहिती समोर आली आहे. संशयित पूजा भोसलो हिने दिलेल्या ठेव पावत्या बनावट असल्याचे समोर आले आहे. यामुळे पोलिसांनी या ठेव पावत्यांचीही पडताळणी सुरु केली आहे. पोलिसांनी आयडीबीआय बँकेच्या लोकमान्यनगर शाखेशी पत्रव्यवहार सुरू केला आहे.
या गुह्यातील दुसरा संशयित आरोपी भारत श्रीपती गाठ (रा. यड्राव रोड, इचलकरंजी) यानेदेखील पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी मोबाइल नंबर बंद ठेवले होते. मात्र, पोलिसांना त्याचा माग मिळाला असून, लवकरच त्याच्यापर्यंत पोहोचत असल्याची माहिती तपास अधिकारी सुनीता शेळके यांनी दिली.
Previous Articleरेशन दुकानात आता ‘आपले सेवा केंद्र’
Next Article मविआची वज्रमूठ सैल; लवकरच सगळे आमच्याकडे येतील









