वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय प्रशासकीय सेवेचे माजी अधिकारी अरुण गोयल यांनी सोमवारी निवडणूक आयुक्ताचा पदभार स्वीकारला आहे. निवडणूक आयोगाने यासंबंधी माहिती दिली आहे. गोयल हे 1985 च्या तुकडीचे पंजाब कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. गोयल यांनी 18 नोव्हेंबर स्वैच्छिक सेवानिवृत्ती घेतली होती.
गोयल यांची शनिवारी निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली होती. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडे यांच्यासोबत ते निवडणूक आयोगाचा हिस्सा असतील.
मे महिन्यात मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांच्या सेवानिवृत्तीनंतर निवडणूक आयोगात एक पद रिक्त होते. गोयल हे यापूर्वी अवजड उद्योग विभागात सचिव पदावर तैनात नियुक्त होते. संस्कृती मंत्रालयातही त्यांनी काम केले आहे. गुजरातमध्ये 1 आणि 5 डिसेंबर रोजी दोन टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होण्यापूर्वी त्यांची नियुक्ती झाली आहे. आगामी काही महिन्यांमध्ये नागालँड, मेघालय, त्रिपुरा आणि कर्नाटकचा निवडणूक कार्यक्रम ठरवताना निवडणूक आयोगाकडे त्याचे तिन्ही सदस्य उपलब्ध असणार आहेत.









