अमेरिकेच्या नेवार्क शहरात मानले होते सिस्टर सिटी
वृत्तसंस्था/ नेवार्क
भारतातून फरार झालेला आरोपी नित्यानंद याचा कथित स्वयंघोषित देश कैलाशासोबतचा अमेरिकेतील शहर नेवार्कने स्वत:चा सिस्टर सिटी करार रद्द केला आहे. नेवार्कच्या माध्यम सचिव सुजैन गॅरोफलो यांनी कराराबद्दल पश्चाताप व्यक्त केला आहे. कैलाशाविषयी अधिक माहिती मिळाल्यावर आम्ही हा करार संपुष्टात आणला आहे. हा करार फसवणुकीद्वारे करण्यात आला होता असे त्यांनी म्हटले आहे.
नेवार्क शहराने 11 जानेवारी रोजी कैलाशासोबत एक सिस्टर सिटी करार केला होता. यानंतर अमेरिकेने आमच्या देशाला मान्यता दिली असल्याचा दावा नित्यानंदने केला होता. या कराराशी निगिडत छायाचित्रे नित्यानंदने फेसबुकवर शेअर केली होती.
नेवार्कच्या कौन्सिलमॅन लुइस क्विंटाना यांनी 18 जानेवारी रोजी हा करार रद्द करण्यासाठी प्रस्ताव मांडला होता. कुठल्याही देशाला सिस्टर सिटी करारात सामील होण्यासाठी तेथे मानवाधिकारांचे योग्य पालन होणे आवश्यक आहे. वादग्रस्त असलेला तसेच मानवाधिकारांचे पालन होत नसलेल्या कुठल्याही देशाला अशाप्रकारच्या करारात सामील करता येत नाही. हा करार म्हणजे एक चूक होती असे लुइस यांनी म्हटले होते.
यापूर्वी 24 फेब्रुवारी रोजी जिनिव्हामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीत नित्यानंदच्या कथित देशाची प्रतिनिधी विजयप्रिया सामील झाली होती. यादरम्यान तिने आर्थिक आणि सामाजिक अधिकारांसोबत शाश्वत विकासावरील चर्चेत भाग घेतला होता. नित्यानंदचा भारतात हिंदूविरोधकांकडून छळ करण्यात येत असल्याचा आरोप तिने केला होता, परंतु नंतर तिने एका व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण दिले होते.
2019 मध्ये फरार
2010 मध्ये नित्यानंदच्या एका महिला शिष्याने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. तपासानंतर 2019 मध्ये गुजरात पोलिसांनी नित्यानंदच्या आश्रमात अपहृत मुलांना ठेवण्यात येत असल्याचे म्हटले होते. तसेच तेथे छापे टाकत पोलिसांनी दोन जणांना अटक केली होती. याचदरम्यान नित्यानंदने देशातून पलायन केले होते. 2020 मध्ये त्याने कैलाशा नावाने स्वत:चा देश स्थापन केल्याचा दावा केला होता, परंतु अद्याप या बेटाला कुठल्याच देशाने स्वतंत्र देशाचा दर्जा दिलेला नाही.









