‘मॉडर्न लव्ह हैदराबाद’ फेम अभिनेत्री
नित्या मेनन ही दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक तेलगू चित्रपटांमधील स्वतःच्या अभिनयाद्वारे तिने कोटय़वधी चाहत्यांची मने जिंकली आहेत. सध्या ती ‘मॉडर्न लव्ह हैदराबाद’द्वारे इंटरनेटवर चर्चेत आहे. अमेझॉन प्राइमच्या ओरिजिनल सीरिजमध्ये नित्या मुख्य भूमिकेत असून तिने स्वतःच्या अभिनयाद्वारे सर्वांची मने जिंकली आहेत. याचदरम्यान तिने स्वतःची दोन छायाचित्रे शेअर केली असून यात ती जखमी दिसून येत आहे.

‘चित्रपटात माझी व्यक्तिरेखा नूरीची होती, नूरीप्रमाणेच आता माझी अवस्था झाली आहे. माझी आई देखील येथे माझ्यासाठी स्वयंपाक करत असल्याचे नित्याने म्हटले आहे. अभिनेत्रीने स्वतःच्या पोस्टद्वारे ‘मॉडर्न लव्ह हैदराबाद’मध्ये तिच्या आईची भूमिका साकारणाऱया रेवती मेनन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. छायाचित्रात नित्याने एका पायावर पट्टी बांधली असून सोबत काठी घेतल्याचे दिसून येते.
नित्या यापूर्वी राणा दग्गुबाती आणि पवन कल्याण यांच्या ‘भीमला नायक’ या चित्रपटात दिसून आली होती. या चित्रपटात प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती. तर अभिनेत्रीने तमिळ चित्रपट ‘तिरुचित्रम्बलम’ आणि ‘आराम थिरुकल्पना’ यांचे चित्रिकरण संपविले आहे. हे दोन्ही पुढील काळात प्रदर्शित होणार आहेत. नित्याने काही हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.









