वृत्तसंस्था/ पाटणा
मुंबईमध्ये होणाऱ्या ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीपूर्वी बिहारमध्ये राजकारण तापले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार हे महाआघाडीचे निमंत्रक न झाल्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यासंबंधी सोमवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपल्याला कोणत्याही पदाची अपेक्षा नसल्याचे वक्तव्य केल्याने उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. संयोजक किंवा निमंत्रक होण्याची आपली इच्छा नाही. अन्य कोणीही हे पद स्विकारावे. मात्र, सर्व विरोधी पक्षांची एकजूट व्हावी हीच आपली इच्छा असल्याचे ते म्हणाले. मात्र नितीशकुमार यांना निमंत्रक न केल्याने आता बिहारमध्ये भाजप नेते नितीशकुमारांवर हल्लाबोल करत आहे. नितीशकुमार प्रत्येक वेळी असेच बोलतात. 2020 मध्येही मला मुख्यमंत्री व्हायचे नाही, असे ते म्हणाले. पण, आजवर मुख्यमंत्री राहिले आहेत, असे भाजप प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी म्हणाले.









