आघाडीसोबत येण्यास अहंकार नसल्याचा निर्वाळा : विरोधी ऐक्यासाठी प्रयत्न सुरूच
► वृत्तसंस्था/ कोलकाता, लखनौ
2024 च्या लोकसभा निवडणुकीतील विरोधी एकजुटीच्या संदर्भात बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी सोमवारी कोलकाता येथे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. ही चर्चा सकारात्मक झाल्याचे नितीश यांनी सांगितले. त्याचवेळी ममता यांनी भाजपविरोधात विरोधी आघाडीसोबत जाण्यात कोणताही अहंकार नसल्याचे सांगितले. पुढील निवडणुकीत भाजप शून्य व्हावा, अशी आपली इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले.
ममतांसोबतच्या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सर्व विरोधी पक्षांनी एका व्यासपीठावर येणे खूप महत्वाचे आहे. त्यासाठी विरोधी पक्षांना एकत्र बसून रणनीती आखावी लागणार आहे. ममताजींशी चांगली चर्चा झाली. इतर पक्षांना सोबत घेऊन भविष्यात चर्चा करू. भारताच्या विकासासाठी काहीही केले जात नसल्याचे नितीश म्हणाले. सत्ताधारी भाजपला केवळ दिखाऊपणाच करायचा असतो, असा आरोपही त्यांनी केला.
भाजपला पराभूत करण्याचा ध्यास
प्रसारमाध्यमांशी बोलताना ममता बॅनर्जी यांनीही आम्ही एकत्र पुढे जाऊ, असे सांगितले. आम्ही सर्वजण एकत्र आहोत हा संदेश आम्हाला द्यायचा आहे. एकजुटीची ताकद दाखवताना आम्हाला कोणताही वैयक्तिक अहंकार नाही. आम्हाला संयुक्तपणे काम करायचे आहे. विरोधी पक्षांना एकत्र करण्याबाबत आम्ही बोललो आहोत. जयप्रकाशजी यांचे आंदोलन बिहारमधून सुरू झाले होते. त्यामुळे आपणही बिहारमध्ये सर्वपक्षीय बैठक घ्यावी, अशी विनंती आपण नितीशकुमार यांना केली आहे. या बैठकीतून आम्ही सर्व विरोधक एकत्र आहोत असा संदेश द्यायचा आहे. यावर माझा कोणताही आक्षेप नाही. मात्र, भाजप शून्य व्हायला हवे ही आपली इच्छा असल्याचे ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले.
लोकांना देशाचा इतिहास बदलायचाय!
मला स्वत:साठी काहीही नकोय. आमची कोणतीही वैयक्तिक इच्छा नाही. आम्ही संपूर्ण देशाच्या हिताचा विचार करत आहोत. लोक संपूर्ण देशाचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. देश सुरक्षित राहावा एवढीच आमची इच्छा आहे, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणाले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी झालेला एवढा मोठा लढा नव्या पिढ्यांना कळायला हवा. सगळे एकत्र आले तर देश सुरक्षित राहील. आम्ही फक्त यासाठीच काम करत आहोत, असेही ते पुढे म्हणाले.
अखिलेश यादव यांच्याशीही चर्चा
नितीशकुमार आणि तेजस्वी यादव यांनी सोमवारी लखनौमध्ये उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचीही भेट घेतली. याप्रसंगी त्यांच्याशीही सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. आमच्या विरोधी ऐक्मयाबाबत चर्चा झाली आहे. जास्तीत जास्त पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न यापुढेही केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
यापूर्वी 12 एप्रिल रोजी नितीशकुमार आणि तेजस्वी यादव यांनी दिल्लीत राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली होती. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेतली होती. सध्या देश कठीण काळातून जात आहे. देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन सरकार बदलणे गरजेचे आहे. नितीशकुमार यांनी घेतलेल्या पुढाकारासोबत आम्ही आहोत, असे या बैठकीनंतर केजरीवाल यांनी स्पष्ट केले होते.









