तेजस्वी यादव अन् संजय झा यांच्याकडून दौरा
वृत्तसंस्था/ चेन्नई
विरोधी पक्षांना एकजूट करण्याच्या मोहिमेकरता 23 जून रोजी होणाऱ्या महाबैठकीच्या पार्श्वभूमीवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे तामिळनाडूच्या दौऱ्यावर जाणार होते, परंतु त्यांचा दौरा ऐनवेळी रद्द झाला आहे. नितीश कुमार यांच्या जागी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी तामिळनाडूत जात तेथील मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांची भेट घेतली आहे.
तेजस्वी यादव यांच्यासोबत संजदचे वरिष्ठ नेते आणि मंत्री संजय झा देखील दौऱ्यावर गेले होते. अखेरच्या क्षणी मुख्यमंत्र्यांचा दौरा का रद्द झाला याची माहिती देणे टाळण्यात आले आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन हे सध्या काँग्रेसवर नाराज असल्याचे समजते. अशा स्थितीत नितीश कुमार हे स्टॅलिन यांची भेट घेत त्यांना महाआघाडीसाठी आयोजित होणाऱ्या बैठकीसाठी विशेष स्वरुपात आमंत्रित करणार होते.
नितीश कुमार यांचा तामिळनाडू दौरा महत्त्वपूर्ण मानला जात होता, कारण विरोधी पक्षांच्या एकजुटता मोहिमेच्या अंतर्गत नितीश हे पहिल्यांदाच एखाद्या दक्षिणेतील राज्याला भेट देणार होते. चेन्नई दौऱ्यादरम्यान नितीश कुमार हे एका कार्यक्रमातही सामील होणार होते.
स्टॅलिन यांची भेट घेतल्यावर तेजस्वी हे मंगळवारीच बिहारमध्ये परतल्याचे समजते. पाटणा येथे होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीचे स्टॅलिन यांना यापूर्वीच आमंत्रण देण्यात आले आहे. महाआघाडीत सामील होण्याची तयारी स्टॅलिन यांनी दर्शविली असल्याचे समजते. परंतु नितीश कुमार यांनी स्वत:चा तामिळनाडू दौरा अखेरच्या क्षणी रद्द केल्याने अनेक प्रकारचे कयास वर्तविले जात आहेत.









