बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अखेर आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि बिहारमधील महागठबंधनाशी असलेले आपले संबंध तोडले. गेले काही दिवसापासून चर्चा सुरु असलेल्या या शक्यतेमुळे बिहार राज्यात एकच राजकीय गोंधळ उडाला होता. आपल्या राजीनाम्यानंतर भाजपप्रणित एनडीए आघाडीचा पाठींबा मिळवून नितीशकुमार सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आज सकाळी काळजीवाहू मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली JD(U), भाजप, HAM आणि एका अपक्ष आमदाराने राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेऊन बिहारमध्ये सरकार स्थापन करण्याचा दावा केला.
नितीश कुमार यांनी स्वत: पुढाकार घेऊन 18 महिन्यांपूर्वी स्थापन केलेल्या इंडिया आघाडीतून बाहेर पडत मोठा धक्का दिला. पक्षाचे राजकीय सल्लागार आणि जेडीयुचे प्रवक्ते के. सी. त्यागी यांनी दिल्लीत माध्यमांशी बोलताना बिहारमधील महागठबंधन आघाडीचे सरकार कोसळण्याच्या मार्गावर आहे. काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने वारंवार नितीश कुमार यांचा “अपमान” केल्याचे म्हटले आहे.
राज्यपालांची भेट घेऊन आपला राजीनामा सुपुर्द केल्यानंतर माध्यमांशी बोलताना नितीशकुमार म्हणाले, “बऱ्याच गोष्टी चुकीच्या चाललेल्या आहेत. तसेच इंडिया आघाडीचे नेर्तृत्वाने माझी फसवणूक केली असून माझा योग्य तो सन्मान झाला नाही. माझ्या कार्यकर्त्यांची आणि आमदारांची आपण एनडीए मध्ये सामिल व्हावे अशी इच्छा बोलून दाखवली आहे. त्यामुळे मी आपल्या पदाचा आज राजीनामा दिला.” असे त्यांनी म्हटले आहे.
नितीश कुमार यांच्या या राजकिय चालीमुळे इंडीया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. नितीश कुमार यांच्या राजीनाम्यामुळे अनेक काँग्रेस नेत्यांसह आरजेडी आणि काँग्रेस मित्र पक्षानेही नितीश कुमार यांच्यावर टिकेची झोड उठवली आहे.