सांगली प्रतिनिधी
वयाच्या 32 व्या वर्षी दानोळी (जि. कोल्हापूर) येथील नितीशकुमार पाटीलने मेंदूत रक्ताच्या गुठळ्या झाल्याने जगाचा निरोप घेतला. पण, मृत्यूनंतरही त्याला अवयव रूपाने जिवंत ठेवत कुटुंबीयांनी अवयवदानाचा नर्णय घेतला. आता त्याचं हृदय एका गरजवंताच्या हृदयात धडधडतय, डोळे कोणालातरी पुन्हा जग दाखवतील. किडनी, लिव्हर, इतरांसाठी उपयोगात आली तर त्वचा अनेकांना नवी काया देईल.
सांगलीतील एकदा दवाखान्यात नितीशकुमारवर उपचार सुरू होते. काळजीपोटी नातेवाईकांनी त्याला उष:काल अभिनव मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. रूग्णाच्या स्थितीची कल्पना देऊन संचालक डॉ. आनंद मालानी यांनी त्यांचे समुपदेशन केले. नितीशकुमारची वाटचाल ब्रेनडेड व्यक्तीकडे सुरू असल्याचे त्यांनी पटवून दले. कुटुंबावर हा मोठा आघात असला तरी सामाजिक बांधिलकीची जाणीव असणाऱ्या या कुटुंबातील सदस्यांनी तसे झाल्यास अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी याच कुटुंबातील त्याच्या एका काकींचे अवयवदान करण्यात आले होते. ब्रेनडेड व्यक्तीची माहिती शासनाला कळविली. दुसऱ्या दिवशी नितीश कुमारचा मृत्यू झाला. त्यानंतर तातडीने ग्रीन कॅरिडोर करून त्याचे अवयव ठिकठिकाणी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.