जेडीयूच्या बैठकीत लालन सिंह यांची घोषणा
वृत्तसंस्था/ पाटणा
जेडीयूने आयोजित केलेल्या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन सिंह उर्फ लालन सिंह यांनी नितीश कुमार हे पंतप्रधानपदाचे उमेदवार नसल्याचे स्पष्ट केले. मुख्यमंत्री नितीशकुमार हे केवळ विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचे काम करत आहेत. भाजपविरोधी पक्षांची एकजूट हा त्यांचा उद्देश आहे. पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल? याचा निर्णय भाजपला सत्तेवरून हटवल्यानंतर घेतला जाईल, असेही ते पुढे म्हणाले.
पक्षाच्या कार्यक्रमातील आपल्या भाषणादरम्यान कार्यकर्त्यांना संबोधित करताना लालन सिंह यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे विषद केले. सुरुवातीलाच त्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार हे पंतप्रधानपदाचे दावेदार नाहीत, असे स्पष्ट केले. ते फक्त भाजपला या देशाच्या सत्तेपासून दूर करण्यासाठी धडपडत आहेत. यामध्ये त्यांना सर्व पक्षांच्या सहकार्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच मेहबुबा मुफ्ती आणि फारूक अब्दुल्ला 23 जून रोजी होणाऱ्या भाजपविरोधी पक्षांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी काश्मीरमधून येणार असल्याचाही निर्वाळा दिला.
मुख्यमंत्री नितीश कुमार 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षांच्या एकजुटीचे नेतृत्व करत आहेत. 23 जून रोजी पाटणा येथे विरोधी पक्षांच्या एकतेची बैठक होणार आहे. देशातील 15 हून अधिक विरोधी पक्षांचे बडे नेते या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचा दावा केला जात आहे.
मायावतींचा दुरावा
दलित नेत्या म्हणून ओळख असलेल्या बहेनजी मायावती या विरोधकांच्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचीही चर्चा आहे. आम्ही देशातील सुमारे पाच राज्यांमध्ये निवडणूक लढवतो आणि यावेळीही आम्ही एकटेच निवडणूक लढवणार आहोत, असे बिहारचे बसप प्रभारी अनिल सिंह यांनी स्पष्ट केले. विरोधी पक्षातील प्रत्येकजण पंतप्रधान पदासाठी आपलेच चेहरे पुढे करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच नितीश कुमारांना बिहार सांभाळता येत नसताना ते देश सांभाळायला जात असल्याचा हल्लाबोलही केला.
मांझी यांनाही निमंत्रण नाही
मायावतींशिवाय बिहारमधील जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्थानी अवाम मोर्चालाही विरोधी ऐक्मयाच्या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आलेले नाही. जीतनराम मांझी यांनी दोन दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली होती.