पाटण्यात पोहोचताच कुशवाह यांचा राजकीय बॉम्ब
वृत्तसंस्था / पाटणा
संजद संसदीय मंडळाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी दिल्लीमधून पाटण्यात पोहोचताच बिहारच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. माझ्या पक्षाचा (संजद) मोठा नेता भाजपच्या संपर्कात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कुशवाह यांनी यावेळी थेट नामोल्लेख करणे टाळत राजकीय उत्सुकता वाढविली आहे.
दिल्लीत स्वतःवर उपचार करवून घेत असताना बिहारमध्ये माझ्या राजकीय निष्ठेचे पोस्टमार्टम केले जात होते. दिल्ली एम्समध्ये दाखल असताना भाजपचे काही नेते मला भेटण्यासाठी आले होते. या गोष्टीचा नको तो अर्थ काढण्यात आला आहे. संजदमधील मोठा नेता भाजपच्या संपर्कात असल्याचे कुशवाह यांनी म्हटले आहे. संजदमध्ये कुशवाह यांच्यापेक्षा मोठे नेते म्हणून केवळ मुख्यमंत्री नितीश कुमार आणि ललन सिंह हेच आहेत.
माझ्याबद्दल अफवा पसरविल्या जात आहेत. वैयक्तिक स्वरुपात माझे अनेकांशी मैत्रीचे संबंध आहेत. यातील काही जण रुग्णालयात माझी विचारपूस करण्यासाठी आले होते. याचा राजकीय अर्थ काढणे चुकीचे आहे. रुग्णालयात मी जिवंत असताना पाटण्यात माझ्यावर राजकीय पोस्टमार्टम करण्यात येत होते असे कुशवाह म्हणाले. कुशवाह यांनी यापूर्वी दोन-तीनवेळा पक्षांतर केले असल्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शनिवारी म्हटले होते.
नितीश कुमार यांनी कुशवाह स्वतःच्या मर्जीनुसार कुठलाही निर्णय घेऊ शकतात असे विधान केले होते. यावर मी कुठल्या पक्षात राहणार आणि कोणत्या पक्षात जाणार याचा निर्णय माझ्याशिवाय दुसरा कोण घेणार असे म्हणत कुशवाह यांनी आपण संजदमध्ये असून कमजोर झालेल्या पक्षाची स्थिती सुधारणार असल्याचे म्हटले आहे.
संजद सातत्याने कमजोर होत असल्याने आमच्यासमोर चिंता आहे. पक्षाच्या मजबुतीसाठी मी सातत्याने प्रयत्न करत आहे. पक्षाच्या कमजोरीबद्दल कुणी बोलत असल्यास याचा दुसरा अर्थ काढला जाणे चुकीचे आहे. माझ्या पक्षातील बहुतांश लोकांचे पक्ष कमजोर झाल्याचे मानणे आहे. हे नेते प्रसारमाध्यमांसमोर बोलणार नाहीत, परंतु वैयक्तिक स्वरुपात व्यक्त होतील. संजद राजकीयदृष्टय़ा आजारी असल्याचे मान्य करावे लागेल. तरच राजकीय उपचार स्वीकारता येतील असे कुशवाह म्हणाले.









