संजदमध्ये फूट पडण्याची शक्यता : भाजपकडून मोठा दावा
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार सुशील कुमार मोदींनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंड हे विरोधी पक्षांच्या पाटण्यातील बैठकीचा परिणाम असल्याचा दावा केला आहे. या बैठकीत राहुल गांधींना प्रमुख चेहरा म्हणून घोषित करण्यासाठीची पार्श्वभूमी तयार केली जात असल्याचे मोदींनी म्हटले आहे. बिहारमध्ये देखील महाराष्ट्रासारखी स्थिती निर्माण होऊ शकते असे म्हणत सुशील कुमार मोदींनी अत्यंत सूचक वक्तव्य केले आहे. तर बिहार भाजप अध्यक्ष सम्राट चौधरी यांनी संजदमध्ये कुठल्याही क्षणी फूट पडू शकते असे वक्तव्य केले आहे.
बिहारमध्ये देखील महाराष्ट्रासारखी स्थिती निर्माण होऊ शकते. याचाच धसका घेत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्वत:च्या पक्षातील आमदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. संजदचे आमदार-खासदार हे राहुल गांधी तसेच तेजस्वी यादव यांना नेता म्हणून स्वीकारणार नसल्याचा दावा मोदींनी केला आहे.
संजदमधून पलायन होण्याची शक्यता आहे. संजदवर स्वत:चे अस्तित्व वाचविण्याचे अशाप्रकारचे संकट यापूर्वी कधीच नव्हते. 13 वर्षांमध्ये कुठल्याच आमदाराची विचारपूस न करणारे नितीश कुमार याचमुळे आता प्रत्येकाला स्वतंत्रपणे भेटत असल्याचे भाजप नेत्याने म्हटले आहे.
संजदमध्ये बंडाची शक्यता
संजद जर महाआघाडीत राहिला, तर तिकीटवाटपात त्याच्या वाट्याला लोकसभेच्या 10 पेक्षा अधिक जागा येणार नाहीत. अशा स्थितीत अनेक खासदारांना संधी हुकणार आहे. हे देखील बंडाचे कारण ठरू शकते असे उद्गार भाजप खासदार मोदींनी काढले आहेत. नितीश कुमार यांनी स्वपक्षीय आमदारांना विश्वासात न घेता भाजपसोबतची आघाडी तोडली, लालूप्रसाद यादवांशी हातमिळवणी केली आणि बिहारच्या विकासाचा वेग रोखला आहे. या स्थितीमुळे संजदमधील असंतोष सातत्याने वाढत आहे. आता वन-टू-वन चर्चेतून ही असंतोषाचा हा भडका शमणार नसल्याचे मोदी म्हणाले.
संजदचेही प्रत्युत्तर
संजदमधून पलायन होण्याच्या भाजपच्या दाव्यावर पक्षाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भाजपसोबत जाण्याची इच्छा व्यक्त करणारे नितीश कुमारांचे पत्र असेल तर ते त्यांनी दाखवावे. भाजपला आम्ही हुकुमशहा, अत्याचारी अन् विभाजनकाऱ्यांचे म्होरके मानतो, यामुळे त्या पक्षासोबत आम्ही जाऊ शकत नाहीत. विरोधी पक्षांच्या ऐक्यामुळे दु:खी होत भाजप अशाप्रकारच्या अफवा पसरवत असल्याचा दावा संजद नेते के.सी. त्यागी यांनी केला आहे.
5-10 दिवसात होणार ‘खेळ’
बिहारमध्ये 5-10 दिवसांत ‘खेला’ होणार आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार हे विधानसभा विसर्जित करण्याची शिफारस करू शकतात. नितीश कुमार हे सत्ता हातची निघून जाईल या भीतीपोटी खासदार अन् आमदारांना बोलावत असल्याची टीका हमचे अध्यक्ष डॉ. संतोष मांझी यांनी केली आहे. संजदचे अनेक आमदार हे तेजस्वी यादव म्हणजेच राजदसोबत जातील. तर उर्वरित आमदार हे भाजपच्या गोटात दाखल होण्याच्या तयारीत आहेत. याचमुळे नितीश कुमार हे पक्षातील फूट टाळण्यासाठी पावले उचलत आहेत असे मांझी म्हणाले.









