पुणे / वार्ताहर :
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी रात्री मंगला टॉकीज समोर नितीन मोहन म्हस्के (वय 35, रा. ताडीवाला रोड, पुणे) या तरुणाचा टोळक्याकडून तलवार, कोयता आणि दगडाने ठेचून निघृण खून करण्यात आला होता. या घटनेनंतर आरोपी पसार झाले होते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकांनी संबंधित आरोपींचा शोध घेऊन कर्नाटकातील बेळगाव परिसरात रायचूर, पुणे ग्रामीण मधील चौफुला, पुणे शहरातील विश्रांतवाडी येथून 17 आरोपींना जेरबंद केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.
सागर ऊर्फ यल्लया ईराप्पा कोळानट्टी (वय 35), सुशील अच्युतराव सुर्यवंशी (27), शशांक ऊर्फ वृषभ संतोष बेंगळे (21), गुडागप्पा फकीरप्पा भागराई (28), मलेश ऊर्फ मल्लया शिवराज कोळी (24), किशोर संभाजी पात्रे (20), साहिल मनोहर कांबळे (21), गणेश शिवाजी चौधरी (24), रोहित बालाजी बंडगर (20, सर्व रा. ताडीवाला रोड, पुणे) या आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांचा एका विधीसंघर्षित मुलास ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी मयत नितीन म्हस्के याचा मित्र सतीश आनंदा वानखेडे याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
घटनेच्या दिवशी नितीन म्हस्के हा मंगला टॉकीज येथे रात्रीचा सिनेमा पाहून दुचाकीवर पाठीमागे बसून मित्रासोबत घरी जात होता. त्यावेळी टॉकीज बाहेर दबा धरुन बसलेल्या त्याच्या वस्तीतील सदर आरोपींनी धारदार शस्त्रासह येत मोटारसायकलवरुन नितीन म्हस्के व त्याचा मित्र सतिश वानखेडे यांना रस्त्यावर पाडले. त्यानंतर महस्के याच्यावर जीवघेणा हल्ला करून त्याचा निघृण खून केला व आरोपी पसार झाले. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व खबऱयामार्फत माहिती घेताना गुन्हयातील मुख्य आरोपी सागर यल्ल्या व त्याचे साथीदार हे लातुर, सोलापूर, कोल्हापूर, पुणे ग्रामीण व पुणे शहर परिसरात तसेच कर्नाटक येथील रायचूर, बेळगावमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथके रवाना झाली होती. गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांचे नेतृत्वात कर्नाटकला गेलेल्या पथकाने दुर्गम भागातून पाच आरोपींना अटक केली. तर उर्वरित पाच आरोपी पुण्यातील विश्रांतवाडी, पुणे ग्रामीण मधील चौफुला येथून जेरबंद करण्यात आले आहे.
याशिवाय दोन आरोपी विवेक भोलेनाथ नवघणे (25, रा. रामवाडी, पुणे) व इम्रान हमीद शेख (31, रा. केशवनगर, पुणे) यांना पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांचे पथकाने मुंढवा परिसरातील केशवनगर मधून अटक केली. आकाश सुनील गायकवाड (22, रा. उत्तमनगर, पुणे) या आरोपीला पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांचे पथकाने खडकवासला परिसरात अटक केली. तर, लॉरेन्स राजू पिल्ले (36),मनोज विकास हावळे (23), रोहन मल्लेष तुपधी (23) व विकी काशीनाथ कांबळे (22, रा.ताडीवाला रोड, पुणे) यांना खराडी, कल्याणीनगर भागातून अटक करण्यात आली आहे. सदर आरोपींच्या ताब्यातून चार मोटारसायकल व पाच मोबाईल असा अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेले दहा आरोपी सराईत गुन्हेगार आहेत.









