‘आयसीसी’कडून जयरामन मदनगोपाल यांना उदयोन्मुख पॅनलमध्ये बढती
वृत्तसंस्था/ दुबई
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मंगळवारी दक्षिण आफ्रिकेचे अल्लाहुदीन पालेकर आणि इंग्लंडचे अॅलेक्स व्हार्फ यांना आयसीसी एलिट पॅनलमध्ये समाविष्ट केले. या गटातील नितीन मेनन हे एकमेव भारतीय आहेत, तर जयरामन मदनगोपाल यांना उदयोन्मुख पंचांच्या गटात बढती देण्यात आली आहे.
मायकेल गॉफ आणि जोएल विल्सन यांची जागा पालेकर आणि व्हार्फ हे दोन नवीन पंच घेतील. बीसीसीआयच्या सूत्रांनुसार, 50 वर्षीय मदनगोपाल यांना उदयोन्मुख पॅनलमध्ये बढती देण्यात आली आहे, ज्यामुळे ते परदेशात कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये पंच म्हणून काम करण्यास पात्र ठरले आहेत. तामिळनाडूचे माजी खेळाडू मदनगोपाल यांनी आतापर्यंत एक कसोटी, 22 एकदिवसीय सामने आणि 42 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंच म्हणून काम केले आहे.
दरम्यान, पंचांच्या एलिट पॅनलमध्ये मेनन हे रिचर्ड इलिंगवर्थ यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहेत. दक्षिण आफ्रिकेचे माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू असलेले पालेकर यांनी पुऊषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चार कसोटी, 23 एकदिवसीय सामने आणि 67 टी-20 सामन्यांत, तर महिलांच्या 17 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंच म्हणून काम केले आहे. त्यांनी 2024 चा पुरुष खेळाडूंचा टी-20 विश्वचषक आणि 19 वर्षांखालील पुऊषांचा क्रिकेट विश्वचषक यासारख्या प्रमुख आयसीसी स्पर्धांमध्येही पंच म्हणून काम केलेले आहे.
व्हार्फ यांच्याकडे प्रथम श्रेणीतील 16 वर्षांच्या अनुभवाचा खजिना असून ते इंग्लंडसाठी 13 एकदिवसीय सामने देखील खेळले आहेत. त्यांनी पुऊषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सात कसोटी, 33 एकदिवसीय सामने आणि 45 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये मैदानावरील पंच म्हणून काम केले आहे. 2024 मधील पुऊष आणि महिलांचे टी-20 विश्वचषक आणि यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्यांनी पंच म्हणून भूमिका बजावलेली आहे. आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी पालेकर आणि व्हार्फ या दोन नवीन पंचांना शुभेच्छा दिल्या आहेत, तर गॉफ आणि विल्सन या पंचांचे आभार मानले आहेत.









