जून 2024 पर्यंत सेवेत कार्यरत राहण्यास मंजुरी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय मंत्रिमंडळाने नितीन गुप्ता यांची सीबीडीटी चेअरमन पदावर पुनर्नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. शनिवारी जारी करण्यात आलेल्या अधिकृत पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. आता नितीन गुप्ता 30 जून 2024 पर्यंत सीबीडीटी चेअरमन पदावर राहतील. नितीन गुप्ता हे 1986 च्या बॅचचे भारतीय महसूल सेवेतील अधिकारी आहेत. गेल्यावषी जूनमध्ये त्यांना सीबीडीटीचे अध्यक्ष बनवण्यात आले होते.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने नितीन गुप्ता यांची सीबीडीटी अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. आता त्यांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती 1 ऑक्टोबर 2023 ते 30 जून 2024 किंवा पुढील आदेश येईपर्यंत वैध असेल.
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस ही आयकर विभागातील सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे. या मंडळात विशेष सचिव दर्जाचे 6 सदस्य असू शकतात. सीबीडीटीचे विद्यमान अध्यक्ष नितीन गुप्ता यांचा कार्यकाळ शनिवार, 30 सप्टेंबर रोजी संपणार होता. मात्र, आता त्यांना 9 महिन्यांची सेवा मुदतवाढ मिळाली आहे. नितीन गुप्ता यांना सीबीडीटी चेअरमन पदावर पुन्हा नियुक्त करण्यासाठी भरतीचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. प्रसिद्धीनुसार, नितीन गुप्ता यांची सामान्य नियम आणि लागू अटींच्या आधारे केंद्रीय कर्मचारी म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या कार्यकाळात आयकर विभागाने सर्वाधिक आयटीआरचा विक्रम केला आहे. यावेळी 7 कोटींहून अधिक आयटीआर दाखल झाले आहेत. यासोबतच रिटर्न प्रक्रियेत लागणारा वेळ कमी करण्याचे श्रेयही नितीन गुप्ता यांना जाते.









