कोल्हापूर : संतोष पाटील
शहरातील प्रमुख डीपी रोड,बाह्य वळण रस्ते आणि उड्डाण पुलाचा सविस्तर विकास आराखडा सादर करा,अशी सुचना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकत्याच झालेल्या कोल्हापूर दौऱ्यात केली. अरुंद रस्ते आणि वाहतुकीची कोंडी ही प्रमुख सामाजिक समस्या कोल्हापूर शहराच्या विकासाला मारक ठरत आहे.कोल्हापूरची ही गरज ना.गडकरी यांनी ओळखून निधीची तरतूद करण्याची ठोस ग्वाही दिली.आता जिह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी आश्वासनाच्या हवेवर विकासाचे मजले बांधण्यात दंग न राहता त्यासाठी प्रामाणिक पाठपुरावा करण्याची गरज आहे.शहराची रस्ते वाहतूक समस्या ना. गडकरी यांना दिसली ती जिह्यातील नेत्यांनाही भावले असल्याचे यापुढे कृतीतून दाखवून द्यावे लागेल.
महापालिकेच्या नोंदीनुसार शहरातील सर्व लहान मोठ्या गल्लीबोळांसह एकूण 1031 किलोमिटरचे रस्ते आहेत.यातील एकात्मकि रस्ते प्रकल्पातील 49 किमी, लिंकरोड 19 किमी आणि नगरोत्थान योजनेतील 39 किमी, राष्ट्रीय महामार्ग सहा किमी असे 114 किलोमिटरच्या रस्त्यांवर वाहतुकीचा सर्वाधिक भार आहे. तर 80 प्रभागांना जोडणारे हद्दीवरचे तसेच मुख्य चौक आणि बाजारपेठेतील रस्ते ज्या ठिकाणी नागरी वस्ती कमी आहे किंवा नाहीच,अशा रस्त्यांच्या दुरुस्तीकडे पैसे नसल्याने दुर्लक्ष होत आहे.मतांवर डोळा ठेवून दर दोन तीन वर्षानंतर गल्लीबोळ चकचकीत करण्याकडे कल असतो.एकात्मकि रस्ते प्रकल्प,लिंकरोड,दोन प्रभागातील हद्दीतील रस्ते,राष्ट्रीय महामार्ग,आदी सुमारे दीडशे किलोमिटरच्या रस्त्यांची मजबूत बांधणी आणि पुर्नर्पृष्ठीकरणासह दुरुस्तीसाठी एकाच वेळी तीनशे कोटी रुपयांची गरज आहे. त्यानंतर या रस्त्यांसाठी दर वषी सरासरी 25 कोटी रुपये खर्च करावे लागतील. तरच शहरातील रस्त्यांची दुरावस्था ही समस्या कायमची निकाली लागू शकते.
आरटीओतील आकडेवारीनुसार कोल्हापुरात मागील वषी कोल्हापुरात 14 लाख 60 हजार 155 वाहने होती. यंदाच्या वषी ती संख्या 16 लाख 78 हजार गेली. यामध्ये 12 लाख 81 हजार 185 दुचाकी आहेत.यातील 40 टक्के वाहने कोल्हापूर शहरातील आहेत.अपूरी पार्कींग व्यवस्था,शहराला वळण रस्त्यांचा अभाव व भाविकांची वाढलेली संख्या यामुळे शहरातील रस्त्यावर ताण पडत आहे.पर्यटन आणि देवदर्शनासाठी येणारी रोजची सरासरी तीन ते पाच हजार वाहने,रस्त्यावर प्रवास करणारी तीन लाखाहून दुचाकीस्वार,प्रवाशी वाहतूक करणारे तीन हजाराहून अधिक जीप व रिक्षा,दोनशेहून अधिक लक्झरी बसेस,विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या चारशेहून अधिक बसेस,कोकणमार्गासह शहरात येणारे हजाराहून अधिक मल्टीअॅक्सल व ओव्हरलोड वाहने,शहरातून ऊस वाहतूक करणारी रोजची सरासरी पाचशे मोठी वाहनं,दीड हजाराहून अधिक मालवाहतूक लहानमोठी वाहने,पार्कींग व्यवस्था नसल्याने रोज रस्त्यावर पार्कींग होणारी लाखभर वाहने ही अवस्था अवघे 6.64 किलोमिटर परिघ असणार शहराची आहे.मागील 50 वर्षात शहरात वाहतुकीचा ताण चौपट वाढला मात्र रस्त्याची क्षमता दुप्पटही झाली नाही.या समस्येवर बाह्य वळण आणि उड्डाण पुलांचा तोडगा काढला नाही तर शहरातील रस्त्यावरुन वाहनच काय चालणेही मुश्कलि होईल.
देशातील रस्ते क्रांतीचे जनक म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ओळख आहे. त्या-त्या शहराची आणि विभागाची राज्याची गरज पाहून राजकारणापलिकडे विकासाची दृष्टी असणारे गडकरी यांचे नेतृत्व असल्याचे मानले जाते. शहरातील वाहतुकीची कोंडीवर उपाय म्हणून महापालिकेने आठ उड्डाण पुलांचा प्रस्ताव तयार केला आहे.दाभोळकर कॉर्नर ते दसरा चौक,मार्केट यार्ड ते छत्रपती ताराराणी चौक,सीपीआर चौक ते बावडा जयंती नाला पूल,पापाची तिकटी ते रंकाळा टॉवर,खासबाग मैदान ते मिरजकर तिकटी,दाभोळकर कॉर्नर ते राजारामपुरी आदी उड्डाण पुलांचा समावेश आहे.कोकणात जाणारे आणि तसेच पुणे,बेंगलोर मार्गाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी शहराच्या भोवताल बाह्य वळण रस्त्यांची गरज आहे.यासर्व प्रकल्पांसाठी किमान दोन हजार कोटी रुपयांची गरज आहे.कोल्हापुरातील रस्ते ही सामाजिक समस्या बनली आहे.सध्यस्थितीत त्यावर नितीन गडकरी यांच्यासारखा दृष्टा नेताच मार्ग काढू शकतो.ना. गडकरी यांनी शहरातील रस्ते आणि उड्डाणपुलांसाठी ठोस तरतूद करण्याची हमी दिली आहे. आता राजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय नेत्यांनी गडकरी यांचे आश्वासन सत्यात उतरवण्यासाठी प्रामाणिक पाठपुरावा करण्याची गरज आहे.
म्हणूनच गडकरी कोल्हापूकरांना भावले
कोल्हापुरात निवडणुकांचा मौसम आला की आश्वासनांचा पाऊस पडतो.विधानसभेला सत्ता द्या शहराची अमुक करु.महापालिकेत सत्ता द्या कोल्हापूरच सोनं करु,हजारो कोटींच्या निधीचा पाऊस पाडू अशी पोकळ आश्वासन सर्वपक्षीय नेत्यांकडून कोल्हापूरकरांनी ऐकूण ती पाठ झाली आहे.ना.नितीन गडकरी यांनी कोणतीही निवडणूक दृष्टीक्षेपात नसताना उड्डाण पूल आणि रस्त्यासाठी निधी देण्याचे प्रामाणिक आश्वासन दिले आहे.गडकरी यांचे आश्वासन शहरवासीयांना भावले असून महापालिका निवडणुकीच्या तोंडावर खासकरुन जिह्यातील भाजपच्या नेत्यांनी कॅश करण्याची करण्याची गरज आहे.
पुलांचे आयुष्यमान संपले
कोल्हापूर हे 1870 पर्यंत पेठा व वस्त्यांमध्ये विभालेले खेडे होते. कसबा बावडा जयंती नाला पूल, संभाजी पूल, साठमारी रस्त्यावरील हुतात्मा पूल, उमा टॉकिज येथील रविवार पूल, आदी महत्वाच्या पुलांची बांधणी त्यावेळच्या जयंती नदीवर झाली. यानंतरच खऱ्या अर्थाने कोल्हापूर पूर्व बाजूला विस्तार झाला.पश्चिमेला पंचगंगा नदी असल्याने शहराच्या वाढीवर नैसर्गिक मर्यादा होत्या.जयंती नाल्यावरील पुलांच्या बांधणीनंतर शाहुपुरी,लक्ष्मीपुरी,राजारामपुरी परिसर वसला. 1870 ते1953 पर्यंत टप्प्याने या पुलांची बांधणी झाली.यानंतरच कोल्हापूरचा भौगोलीक विस्तार झाला किंबंहुना कोल्हापूर विस्तारावे यासाठीच या पुलांची नियोजनपूर्वीक बांधणी करण्यात आली. शहरातील प्रवेशासाठी आजही एकमेव मार्ग म्हणून ही पुल गेली दीडशे वर्षे सेवा देत आहेत. कसबा बावडा जयंती नाल्यावर 1876 साली पुलाची बांधणी झाली. लक्ष्मीपूरीतील संभाजी पुल 1870 साली बांधण्यात आला. रविवार पूल 1879 साली झाला.हुतात्मा पार्क येथील उत्तर व दक्षिण बाजूने दोन्ही पूल नव्याने 1953 साली बांधण्यात आले. दसरा चौकातील शाहू पूल 1875 साली उभा राहिला. तर लक्ष्मीपूरीतील विल्सन पूल 1892साली बांधण्यात आला आहे. शहराच्या विस्तारात व विकासात मैलाचा दगड ठरलेल्या पुलांचे आयुष्यमान स्थापत्य शास्त्राच्या निकषानुसार संपलेले आहे. निर्माण काळात घोडागाडीची वाहतुक नजरेपुढे ठेवून या पुलांची बांधणी झाली. मात्र, आजही जुन्या पायावर हजारो टन अवझड वाहनांची वाहतुकीचा भार ही पुल सोसत आहेत.
Previous Articleअर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक
Next Article देवगडची रेणुका पहिली अग्निवीर









