ऑनलाईन टीम / तरुण भारत :
प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब आज सकाळी उजेडात आली. देसाईंच्या आत्महत्येच्या वृत्ताने मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. देसाईंच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. मात्र, आर्थिक विवंचनेतून देसाई यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार, नितीन देसाई यांच्या ND’s Arts World PVT LTD ने 2016 आणि 2018 मध्ये ECL फायनान्सकडून सुमारे 185 कोटींची 2 कर्ज घेतली होती. यासाठी देसाई यांनी 3 वेगवेगळ्या अशा 40 एकरच्या मालमत्ता तारण ठेवल्या होत्या. काही कालावधीनंतर CFM ने आपल्याकडील सर्व कर्ज खाते एडलवाइस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीकडे सोपवली. पण त्यानंतरही कर्जाची वसुली होत नव्हती. दरम्यानच्या काळात 180 कोटींचे कर्ज व्याजासह 252 कोटींच्या घरात पोहोचले. त्यामुळे देसाई प्रचंड आर्थिक तंगीत सापडले होते.
जानेवारी 2020 पासून त्यांच्यामागे कर्ज परतफेडीचा ससेमिरा सुरू झाला होता. 7 मे 2021 रोजी देसाई यांच्या एनडी स्टुडिओला आग लागली होती. यात त्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यातच कर्ज पुरवठादारांनीही देसाईंना कर्जाच्या वसुलीबाबत नोटीस पाठवली होती. काही महिन्यांपासून स्टुडिओचा ताबा मिळवण्यासाठी कर्ज देणाऱ्या कंपन्यांनी हालचाल केली होती, त्यामुळे देसाई तणावाखाली होते, अशी माहिती समोर आली आहे.








