Nitin Asayekar, son of Malgaon village, was honored with National Navratna Award
राष्ट्रीय नवरत्न पुरस्कार 2023 या पुरस्काराच्या विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत . भारतातील विविध क्षेत्रातील विशेष कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी बहाल करण्यात येणारा हा पुरस्कार प्रथमच कला या क्षेत्रातून महाराष्ट्रातील कोकणच्या “दशावतार” या कलेला लाभला आहे. दशावतार या सर्वांच्या लाडक्या लोककलेची दखल या पुरस्कारासाठी घेताना सुप्रसिद्ध दशावतार नाट्य कलाकार तथा अभिनय सम्राट सावंतवाडी तालुक्यातील मळगांव या गावचे सुपुत्र नितीन आसयेकर यांची संपूर्ण भारतातून “कला”या विभागात उत्कृष्ट व अलौकिक कार्यासाठी निवडक नवरत्नांमध्ये निवड करण्यात आली आहे. नितिन आसयेकर यांनी “राष्ट्रीय नवरत्न पुरस्कार 2023” या पुरस्काराच्या ट्रॉफीवर कला या विभागात दशावतार क्षेत्रातून आपले नाव सुवर्ण अक्षरात कोरले आहे.
या पुरस्कारावर आपले नाव कोरणारे नितिन आसयेकर हे पहिले नाट्यकलाकार ठरले आहेत.इतकेच नव्हेतर तीन राज्यस्तरीय पुरस्कारांची हॅट्रिक केल्यानंतर ते हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणारे दशावतार या क्षेत्रातील पहिलेच कलाकार ठरले आहेत.दशावतार नितिन आसयेकर यांना हा पुरस्कार रविवार दिनांक 05 फेब्रुवारी 2023 रोजी एरोली, नवी मुंबई येथे प्रदान करण्यात आला. नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेला हा दिमाखदार सोहळा अर्थात “राष्ट्रीय नवरत्न पुरस्कार वितरण” कार्यक्रम मोठया थाटामाटात पार पडला.या कार्यक्रमात भारतातील विविध क्षेत्रातील नामांकीत व्यक्ती,व्यवसायिक, सिनेसृष्टीतील नाट्यकर्मी तसेच पुरस्कार विजेते उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत नितिन आसयेकर यांना पुरस्कृत करण्यात आले.या समारंभास देश भरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.शशिकांत खामकर यांच्या हस्ते नितीन आसयेकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमास नितीन आसयेकर फॅन क्लब ग्रुपचे सदस्य राजेश म्हापणकर,पांडुरंग पालव,स्वप्नील पालव आदी उपस्थित होते.यावेळी राजेश म्हापणकर यांनी आपल्या सुरेल आवाजात हिंदी गाण्याने समारंभात रंगत आणली. तर अनेक कलाकारांनी विविध नृत्याविष्काराने उपस्थित मान्यवरांची मने जिंकली.अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांच्या जोडीने अतिशय देखणा व डोळयांचे पारणे फेडणारा हा राष्ट्रीय नवरत्न पुरस्कार 2023 सोहळा रविवारी अतिशय उत्साहात संपन्न झाला.
न्हावेली /वार्ताहर









