वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सौदी अरेबियातील दमाम येथे सुरू असलेल्या 18 वर्षांखालील वयोगटाच्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी भारताचा अॅथलिट निश्चयने गोळाफेक प्रकारात रोप्य पदक पटकाविले.
हरियाणाच्या 16 वर्षीय निश्चयने मुलांच्या गोळाफेक प्रकारात 19.59 मी.चे अंतर नोंदवित दुसऱ्या स्थानासह रौप्य पदक मिळविले. या क्रीडा प्रकारात चीनच्या हेन क्विगेंगने 20.23 मी.चे अंतर नोंदवित सुवर्ण पदक तर सिंगापूरच्या अॅनसन लोहने 18.59 मी.चे अंतर नोंदवित कांस्यपदक घेतले. निश्चयने या क्रीडा प्रकारात गेल्या महिन्यात 18.93 मी.ची सर्वोच्च कामगिरी केली होती.
या स्पर्धेत महिलांच्या थाळीफेक प्रकारात भारताच्या लक्षीता महलवासने 41.30 चे अंतर नोंदवित कांस्य पदक घेतले. या क्रीडा प्रकारात चीनच्या मा चेनईने 53.81 मी.चे अंतर नोंदवित सुवर्ण तर चीनच्या झाओ अॅनक्वीने 47.89 मी.चे अंतर नोंदवित रौप्य पदक नोंदविले. मुलींच्या 18 वर्षांखालील वयोगटातील 100 मी. अडथळ्याच्या शर्यतीत भारताच्या शौर्या अंबोरेने कांस्य पदक मिळविताना 13.80 सेकंदाचा अवधी घेतला. या क्रीडा प्रकारात चीनच्या बाओ यीनयीनने 13.71 सेकंदाचा अवधी घेत सुवर्ण तर चीनच्या ही यीहुईने 13.76 सेकंदाचा अवधी घेत रौप्य पदक मिळविले.









