नितीश कुमार यांच्या अनुमतीची प्रतीक्षा
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी संयुक्त जनता दलाचे नेते आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांच्या राजकारणातील प्रवेशावरून हालचालींनी जोर पकडला आहे. परंतु नितीश कुमार हे दीर्घकाळापासून घराणेशाहीच्या विरोधात राहिले आहेत, तरीही पक्ष टिकविण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी निशांत यांचा राजकारणातील प्रवेश आवश्यक असल्याचा मतप्रवाह संजदमध्ये निर्माण होतोय. निशांत त्वरित राजकारणात न आल्यास संजदला निवडणुकीत नुकसान पत्करावे लागू शकते असे रालोआतील घटक पक्ष राष्ट्रीय लोक मोर्चाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी म्हटले होते.
निशांत राजकारणात पाऊल ठेवण्यास तयार आहेत, परंतु त्यांना केवळ स्वत:च्या पित्याच्या मंजुरीची आवश्यकता असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. घराणेशाहीला चालना न देण्याच्या नितीश कुमार यांच्या भूमिकेची आम्हाला जाणीव आहे, परंतु आम्हाला व्यवहारिक व्हावे लागेल. संजदला पक्ष म्हणून टिकविण्यासाठी निशांत यांना राजकारणात आणावे लागणार आहे. ते पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण करण्यासह पक्षाला मजबूत करू शकतात, असा दावा संजदच्या एका नेत्याने केला आहे.
नितीश कुमार यांची प्रकृती आणि प्रशासनावरील नियंत्रणाबद्दल चिंता वाढली आहे. सरकारचे काही निर्णय अधिकाऱ्यांच्या प्रभावात घेण्यात आल्याने पक्षाची पकड कमकुवत होत असल्याचा दावा काही नेत्यांनी केला आहे. रालोआची स्थिती 100 हून अधिक विधानसभा मतदारसंघांमध्ये भक्कम आहे, परंतु दलित आणि युवा वर्गाची भागीदारी घटली आहे. निशांत ही स्थिती बदलू शकतात असे एका वरिष्ठ नेत्याने म्हटले आहे.
संजदमध्ये समर्थन
निशांत यांना राजकारणात प्रवेश करताना मी पाहू इच्छितो, परंतु अंतिम निर्णय नितीश कुमार हेच घेतील, असे संजदचे कार्यकारी अध्यक्ष संजय कुमार झा यांनी म्हटले आहे. नालंदापासून हरनौतपर्यंत निशांत यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविण्याची मागणी झाली आहे. निशांत यांनी अनेकदा जनतेसमोर येत स्वत:च्या पित्याला समर्थन देण्याचे आवाहन केले आहे.









