वृत्तसंस्था/ ताश्कंद (अझरबैजान)
भारताचा युवा बॉक्सिंग स्टार निशांत देव याने बुधवारी ताश्कंद, उझबेकिस्तान येथे सुरु असलेल्या पुरुष जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
बुधवारी 71 किलो वजनी गटात झालेल्या लढतीत निशांतने शानदार कामगिरी साकारताना अझरबैजानच्या सरखान अलीयेवचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला. भारताच्या या 22 वर्षीय युवा बॉक्सरने सुरुवातीपासून आक्रमक खेळताना प्रतिस्पर्धी सरखानला जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही. यामुळे निशांतने त्याला सहजरित्या पराभूत करत पुढील फेरी गाठली. आता पुढील फेरीत निशांतचा सामना दक्षिण कोरियाच्या ली संगमिनशी होणार आहे.
गुरुवारी, चार भारतीय बॉक्सर आपली सलामीच्या लढतीसाठी रिंगमध्ये उतरतील. यामध्ये 2022 चा थायलंड ओपन चॅम्पियन गोविंद सहानी (48 किलो) ताजिकिस्तानच्या मेहरोन शफीवशी तर 2019 आशियाई रौप्यपदक विजेता दीपक कुमार (51 किलो) इक्वेडोरच्या लुईस डेलगाडोशी भिडणार आहे. याशिवाय विक्रमी सहा वेळा आशियाई पदक विजेता शिवा थापा (63.5 किलो), राऊंड ऑफ 16 स्टेजपासून आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. सध्या सुरू असलेल्या या स्पर्धेत 107 देशांतील अनेक ऑलिम्पिक पदक विजेत्यांसह 538 बॉक्सर्सचा सहभाग आहे.









