अभिनाश जमवाल, अभिमन्यू लॉरा पराभूत
वृत्तसंस्था/ बँकॉक
येथे सुरु असलेल्या दुसऱ्या विश्व मुष्टियुद्ध ऑलिम्पिक पात्र फेरीच्या स्पर्धेत मंगळवारी पुरुष विभागात भारताच्या निशांत देवने केवळ 2 मिनिटांच्या कालावधीत प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळविला. नंतर सचिन सिवाचनेही प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवित आगेकूच केली. मात्र भारताच्या अभिनाश जमवालला पहिल्या फेरीत हार पत्करावी लागली. महिलांच्या विभागात भारताची माजी विश्व युवा चॅम्पियन अंकुशिता बोरोने पहिल्या फेरीतील लढत जिंकली. मात्र भारताच्या अभिमन्यू लॉराला पराभव पत्करावा लागला.
पुरुषांच्या 71 किलो वजन गटातील मंगळवारी झालेल्या लढतीत निशांत देवने मंगोलियाच्या इरडेंटोचा केवळ 2 मिनिटांच्या कालावधीत पराभव करत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पंचांनी ही लढत पहिल्या राऊंडमधील 58 सेकंद झाले असताना थांबवली. त्यानंतर दुसऱ्या राऊंडमध्ये देवने जबरदस्त ठोशावर प्रतिस्पर्ध्याला घायाळ केल्याने त्याने हा सामना एकतर्फी जिंकला. पुरुषांच्या 63.5 किलो वजन गटातील पहिल्या फेरीच्या लढती कोलंबियाच्या जोस फोरेने भारताच्या अभिनाश जमवालचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला.
पुरुषांच्या 57 किलो वजन गटात भारताच्या सचिन सिवाचने डेन्मार्कच्या प्रेडरिक जेन्सेनचा 5-0 असा एकतर्फी पराभव करून पुढच्या फेरीत स्थान मिळविले. पहिल्या राऊंडमध्ये वर्चस्व मिळविल्यावर नंतरच्या फेऱ्यातही त्याने ठोशांचा सढळ व प्रभावीपणे वापर करीत जेन्सेनला नामोहरम केले आणि सर्व पाचही पंचांनी सिवाचला गुण दिले.
महिलांच्या विभागात भारताची माजी विश्व युवा चॅम्पियन अंकुशिता बोरोने 7 किलो वजन गटातील लढतीत मंगोलियाच्या नेमुन माँकोरचा 4-1 अशा गुणांनी पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. मात्र 80 किलो वजन गटातील एका लढतीत भारताच्या राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या अभिमन्यू लॉराला आयर्लंडच्या केलिन कॅसेडीने 0-5 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी कोटो पद्धतीनुसार भारताच्या निखत झरिन, प्रिती आणि लवलिना बोर्गोहेन यांनी आपले तिकीट निश्चित केले आहे. बँकॉकमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत भारतातर्फे 7 पुरुष आणि 3 महिला स्पर्धकांनी आपला सहभाग दर्शवला आहे. या भारतीय स्पर्धकांपैकी 5 जणांना विविध वजन गटात पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे.









