‘कॉलर आयडी’ बंद पडल्यामुळे होता संपर्काबाहेर : वनविभागाच्या 100 हून अधिक कर्मचाऱ्यांकडून शोध
वृत्तसंस्था/ कुनो
मध्य प्रदेशातील कुनो येथे दक्षिण आफ्रिकन चित्ता ‘निरवा’ या मादीला 22 दिवसांनंतर रविवारी सकाळी 10 वाजता धोरेट रेंजमधून पकडण्यात आले आहे. 21 जुलै रोजी त्याच्या गळ्यातील ‘कॉलर आयडी’ने काम करणे बंद केल्यापासून त्याचा थांगपत्ता लागत नव्हता. ‘कॉलर आयडी’ बंद पडल्यामुळे सॅटेलाईटद्वारे लोकेशन मिळणे बंद झाल्यापासून अधिकारी, पशुवैद्यक आणि चित्ता ट्रॅकर्ससह 100 हून अधिक क्षेत्रीय वन कर्मचारी रात्रंदिवस त्याचा शोध घेत होते.
तब्बल 22 दिवसांनी ‘निरवा’ याला पकडण्यात यश आले. पीसीसीएफ वन्यजीव आणि मध्य प्रदेशच्या मुख्य वन्यजीव वॉर्डनने ‘निरवा’ला पकडल्याची पुष्टी दिली आहे. गेल्या 22 दिवसांपासून त्याची शोधाशोध सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कुनो राष्ट्रीय उद्यानातील सर्व 15 चित्ते (7 नर, 7 मादी आणि 1 मादी शावक) आता निर्धारित अधिवास क्षेत्रामध्ये असून ते निरोगी असल्याचा दावा केला जात आहे. कुनो पशुवैद्यकीय पथकाकडून त्यांच्या आरोग्याची सातत्याने काळजी घेतली जात आहे. अलीकडेच काही चित्त्यांच्या मृत्यू झाल्यानंतर चित्ता संवर्धन माहिमेबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात होत्या.
दक्षिण आफ्रिकन मादी चित्ता ‘निरवा’चे कॉलर सॅटेलाईट लोकेशन 21 जुलैपासून थांबल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तेव्हापासून त्याचा शोध सुरू होता. 11 ऑगस्टच्या संध्याकाळी ‘निरवा’चे लोकेशन सॅटेलाईटद्वारे मिळाले होते. त्यानंतर तात्काळ शोधपथके संबंधित ठिकाणी पाठवण्यात आली. 12 ऑगस्ट रोजी दिवसभरात उपग्रहाद्वारे ‘निरवा’च्या इतर ठिकाणांची माहितीही मिळाली. श्वानपथक आणि ड्रोन पथकाच्या मदतीने वन्यजीव डॉक्टरांच्या पथकाने ‘निरवा’चा शोध घेतला. कुनो पार्क व्यवस्थापनाने ‘निरवा’च्या शोधासाठी 100 हून अधिक व्यवस्थापन कर्मचाऱ्यांची मदत घेतली. त्यात अधिकारी, कर्मचारी, वन्यजीव डॉक्टर आणि चित्ता टेकर्सचा समावेश होता. दोन ड्रोन पथके, श्वानपथक आणि उपलब्ध हत्तींचा वापर ‘निरवा’च्या शोधासाठी करण्यात येत होता. दररोज सुमारे 15 ते 20 स्क्वेअर किमी परिसरात शोध घेतला जात होता. याशिवाय स्थानिक ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे चाचणी व पडताळणी करण्यासाठी स्वतंत्र पथके तैनात करण्यात आली होती.









