कोल्हापूर / इम्रान गवंडी :
संभाजीनगर एसटी आगाराकडे जिल्ह्यासह परराज्यातून येणाऱ्या एसटी बस याच चौकातून मार्गस्थ होतात. शहर व उपनगरांना जोडणारा मुख्य रस्ता असल्यामुळे या चौकामध्ये वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. हा चौक म्हणजे एकीकडे उपनगरातील आटेनगर, कळंबा, आर. के. नगर, पाचगाव, गिरगाव तर दुसरीकडे शिवाजीपेठ मंगळवार पेठेसह शहरातील सर्वच भागांना जोडणारा प्रमुख मार्ग आहे. त्याचबरोबर या चौकातून गारगोटी, राधानगरी, गडहिंग्लज आदी ग्रामीण भागातील एसटी बस व प्रवाशांची नेहमी वर्दळ असते. आर. के. नगर, कळंबा, पाचगाव केएमटीचा मार्ग आहे. त्यामुळे केएमटीच्या वर्दळीसह आवजड वाहनांची ये–जा सुरू असते.
इतकी प्रचंड वाहतूक असतानाही या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना केलेली नाही. वाहतूक नियंत्रणासाठी झेब्रा क्रॉसिंग स्टॉप लाईट गतिरोधक याचा अभावामुळे दिवसेंदिवस अपघातामध्ये वाढ होत आहे. पूर्वी या ठिकाणी गतीरोधक बसविण्यात आले होते. कालांतराने हे गतीरोधक खराब झाले. सध्या, अर्धवट तुटलेल्या स्थितीत गतीरोधक अस्तित्वात आहे. यामुळे वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. वाहतूक नियंत्रण उपाययोजना होण्यासाठी येथील नागरिकांनी अनेक वेळा आंदोलनही केलेली आहेत. तरीही प्रशासनाने याकडे लक्ष दिलेले नाही.
- आणखी किती बळी घेणार…?
31 डिसेबर 2024 रोजी एसटी बस व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात जरगनगर येथील वृद्धाला जीव गमवावा लागला होता. यापूर्वीही एका वकीलाचाही याच चौकात झालेल्या अपघतात मृत्यू झाला होता. यावेळी नागरिकांनी तत्काळ य्राठकाणी गतीरोधक व रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी केली होती. मात्र, याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असुन अद्यापही हीच स्थिती कायम आहे. यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात असुन आणखी किती बळी घेणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
- एका पावसात रस्ता गेला वाहून
दरवर्षी पावसाळा आला की या ठिकाणी पॅचवर्क करून तात्पुरती मलमपट्टी केली जाते. मागील वर्षी याठिकाणी नव्याने रस्ता केला होता. मात्र, एका पावसातच हा रस्ता वाहून गेला. याची खडी रस्त्यावर पसरली आहे. यामुळे कामाच्या दर्जावर प्रश्न चिन्ह उपस्थित केला जात आहे.
- 24 तास पाणी गळती
चौकाच्या बाजूलाच आर. के. नगर, पाचगाव, राजेंद्रनगर आदी उपनगरासह ई वार्ड परिसरातील भागातील पाणीपुरवठा करण्यासाठी मुख्य पाईपलाईनला व्हॉल्व बसविला आहे. या व्हॉल्वमधून चोवीस तास पाणी बाहेर पडत असते. हे पाणी हॉकी स्टेडियम चौकापर्यंत वाहत असते. येथील गळती रोखण्यासही प्रशासानाला अपयश आले आहे.
- … अन्यथा आंदोलन
निर्माण चौक खराब रस्ते, वर्दळीमुळे धोकादायक बनला आहे. या ठिकाणी रोज छोट्या मोठ्या अपघताचे सत्र सुरूच आहे. येथील वाहतूक नियंत्रण उपायोजना होण्यासाठी पूर्वी अनेक वेळा आंदोलनही केलेली आहेत. तरीही प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्वरित उपयोजना करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल.
अॅड. प्रमोद दाभाडे, नागरिक
- त्वरित उपाययोजना करा
शालेय विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक यांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत घेऊन जावे लागते. चौकात वारंवार अपघात होतात. यावर लवकरात लवकर उपाययोजना करावी. कायमस्वरूपी वाहतूक नियंत्रण पोलिसांची गरज आहे.
सुप्रिया पाटील, नागरिक








