माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांचा उपक्रम
बेळगाव : गणेशोत्सवादरम्यान निर्माण होणारे निर्माल्य इतरत्र फेकले जाऊ नये, या उद्देशाने माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्या माध्यमातून फिरते निर्माल्य कुंड ही संकल्पना राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे यंदाचे हे दहावे वर्ष असून शनिवारी अनगोळ परिसरात निर्माल्य जमा करण्यात आले. निर्माल्य पुंडाचे पूजन जोतिबा यळ्ळूरकर यांच्या हस्ते करण्यात आले. सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत चार वॉर्डांमध्ये वाहन फिरते राहणार आहे. शिवशक्तीनगर, सिद्धिविनायक मंदिरात झालेल्या या कार्यक्रमाला माजी नगरसेवक विनायक गुंजटकर, विनय राजगोळकर, प्रतीक कुट्रे, विश्वनाथ पवार, मारुती देमजी, पिंटू पाटील, विघ्नेश गुंजटकर, अभिषेक कुट्रे, मारुती तळवार आदी उपस्थित होते. गणेशोत्सव काळात फुले व पूजा साहित्याचे मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा होते. वाहत्या पाण्यामध्ये सोडण्याची व्यवस्था नसल्यामुळे अनेकजण कचऱ्यामध्ये निर्माल्य टाकत असल्याचे निदर्शनास आल्याने विनायक गुंजटकर यांनी फिरत्या निर्माल्य कुंडाचा पर्याय चालू केला. घरोघरी जाऊन निर्माल्य जमा केले जात असल्याने गणेश भक्तांमध्ये या उपक्रमाचे कौतुक होत आहे.









